पीटीआय, वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी २०२४ च्या राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीसाठी डेमोक्रेटिक पक्षातून आपली उमेदवारी मंगळवारी जाहीर केली. उपाध्यक्ष कमला हॅरीस यांच्या साथीने त्यांनी प्रचारमोहिमेचा प्रारंभ केला. ‘हाती घेतलेले काम पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्याला आणखी एक कार्यकाळ संधी द्यावी,’ असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
२०२०मध्ये झालेल्या निवडणुकीत बायडेन तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करून अध्यक्ष झाले. त्यावेळी ते इतिहासातील सर्वात वयोवृद्ध अध्यक्ष बनले असले तरी ते दुसऱ्या कार्यकाळासाठी नशीब आजमावतील, अशी शक्यता काही दिवसांपासून वर्तविली जात होती.
बायडेन विरुद्ध ट्रम्प?
२०२०मध्ये दिसलेल्या बायडेन आणि ट्रम्प लढतीचा दुसरा अंक दिसणार याची आता उत्सुकता आहे. बायडेन दुसऱ्या कार्यकाळासाठी रिंगणात उतरल्याने परंपरेनुसार त्यांनी डेमोक्रेटिक पक्षातून विरोध होण्याची फारशी शक्यता नाही. रिपब्लिकन पक्षात नोव्हेंबरमध्ये ट्रम्प यांनी उमेदवारी जाहीर केली. तर फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डिसँटिस हेदेखील मैदानात उतरले आहेत.
