वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी नव्याने आयातशुल्काची घोषणा केली. त्यामध्ये प्रामुख्याने औषधांवर १०० टक्के आयात शुल्क आकारले जाणार आहे. यामुळे भारतीय औषधनिर्माण कंपन्यांवर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे. अमेरिका ही भारतीय औषधनिर्माण कंपन्यांची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. गेल्या वर्षी भारतीय औषध कंपन्यांनी अमेरिकेला केलेली निर्यात १३.१ अब्ज डॉलर इतकी होती. मात्र, केंद्र सरकारने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी आपल्या ‘ट्रुथ सोशल’ या समाजमाध्यमावर आयात शुल्कवाढीची घोषणा केली. त्यासाठी त्यांनी कोणतेही कायदेशीर कारण दिले नाही. मात्र, ‘राष्ट्रीय सुरक्षा आणि अमेरिकी कंपन्यांचा अन्यायकारक स्पर्धेपासून बचाव’ करण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. “१ ऑक्टोबरपासून औषधांवर १०० टक्के; स्वयंपाकघरांमधील कॅबिनेट आणि स्नानगृहातील चैनीच्या सुविधांवर ५० टक्के; सोफा, खुर्ची किंवा पलंगासारखे आरामदायी फर्निचर यावर ३० टक्के आणि अवजड ट्रकवर २५ टक्के आयातशुल्क लागू करणार आहे,” असे ट्रम्प यांनी लिहिले.

वाढीव आयातशुल्कामुळे देशांतर्गत उत्पादन वाढून सरकारी अंदाजपत्रकातील तूट कमी करता येईल, असा विश्वास ट्रम्प यांना वाटत असल्याचे निरीक्षकांचे म्हणणे आहे. ज्या औषधनिर्माण कंपन्या अमेरिकेत कारखाने उभारत आहेत त्यांना ही शुल्कवाढ लागू होणार नाही, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. मात्र, ज्या कंपन्यांचे आधीच अमेरिकेत कारखाने आहेत त्यांना किती आयात शुल्क आकारले जाईल ते स्पष्ट करण्यात आलेले नाही. ट्रम्प यांनी या वर्षाच्या सुरुवातीला दिलेल्या आयातशुल्काच्या धमकीमुळे ‘जॉन्सन अँड जॉन्सन’, ‘ॲस्ट्राझेनेका’, ‘रोशे’, ‘ब्रिस्टल मायर्स स्क्विब’ आणि ‘एली लिली’ यासारख्या प्रमुख औषधनिर्माण कंपन्यांनी अमेरिकेत उत्पादन सुरू करण्यासाठी गुंतवणुकीची घोषणा केली, असे व्हाइट हाऊसचे म्हणणे आहे.

गेल्या वर्षीची निर्यात

अमेरिकेच्या ‘सेन्सस ब्युरोने’ दिलेल्या माहितीनुसार, २०२४मध्ये अमेरिकेने जवळपास २३३ अब्ज डॉलर किमतीची औषधे आणि औषध उत्पादने आयात केली. त्यापैकी ६ टक्के वाटा भारतीय कंपन्यांचा होता. आयात शुल्कवाढीमुळे काही औषधांची किंमत दुपटीने वाढण्याची भीती आहे. त्यापाठोपाठ मेडिकेअर (६५ वर्षांपेक्षा अधिक वय आणि मधुमेह रुग्णांसाठी) आणि मेडिकाएड (मर्यादित उत्पन्न व उत्पन्न स्रोत असलेल्यांसाठी) या विमा योजनांचाही खर्च वाढण्याची शक्यता आहे.

महिन्याभरात घुमजाव

औषध कंपन्यांना अमेरिकेत कारखाने उभारण्यासाठी आणि उत्पादन अमेरिकेत हलवण्यासाठी वेळ मिळावा यासाठी हे आयात शुल्क टप्प्याटप्प्याने लागू केले जातील, असे खुद्द ट्रम्प यांनीच यापूर्वी सूचित केले होते. “औषध कंपन्यांवर थोडे आयात शुल्क लागू करून आम्ही सुरुवात करू. त्यानंतर ते वर्षभरात किंवा त्यापेक्षा जास्त काळात वाढवून १५० टक्के किंवा २५० टक्केही करू,” असे त्यांनी ऑगस्टमध्ये ‘सीएनबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. त्यामुळे त्यांनी अचानक घोषणा करणे धक्कादायक मानले जात आहे.

वाढीव आयात शुल्कामुळे अमेरिकी नागरिकांच्या आरोग्याचे नुकसान होऊ शकते. त्यांना तत्काळ दरवाढ, गुंतागुंतीच्या विमा यंत्रणा, रुग्णालयांची कमतरता आणि रुग्णांनी आवश्यक औषधांमध्ये कपात करणे किंवा पूर्णपणे बंद करणे असे धोके उद्भवतात. – पास्कल चान, उपाध्यक्ष, कॅनडियन चेंबर ऑफ कॉमर्स

भारतीय कंपन्यांवर परिणाम नाही

हैदराबाद : ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताकडून अमेरिकेला केल्या जाणाऱ्या जेनरिक औषधांच्या निर्यातीवर फारसा परिणाम होणार नाही अशी माहिती ‘भारतीय औषध निर्यात प्रोत्साहन परिषदे’चे (फार्मेक्सिल) अध्यक्ष नमित जोशी यांनी शुक्रवारी सांगितले. भारताकडून अमेरिकेला केल्या जाणाऱ्या औषध निर्यातीमध्ये प्रामुख्याने जेनरिक औषधांचा समावेश असतो, असे त्यांनी सांगितले.