Donald Trump And Narendra Modi Relations: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी संवाद साधल्यानंतर, अमेरिकेचे खासदार लिंडसे ग्रॅहम यांनी भारताला युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मदत करण्यासाठी त्यांच्या “प्रभावाचा” वापर करण्याचे आवाहन केले आहे.

“मी भारतातील माझ्या मित्रांना सांगत आलो आहे की, भारत-अमेरिका संबंध सुधारण्यासाठी ते करू शकतील अशा सर्वात महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक म्हणजे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना युक्रेनमधील हा रक्तपात संपवण्यास मदत करणे”, असे ग्रॅहम यांनी सोशल मीडियावर म्हटले.

ग्राहम म्हणाले की, भारत हा रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करणारा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे, ज्यामुळे “पुतिनच्या युद्धयंत्रणेला ताकद मिळते.” ते पुढे म्हणाले, “मला आशा आहे की, पंतप्रधान मोदींनी पुतिन यांना त्यांच्या अलीकडील फोन कॉलमध्ये युक्रेनमधील हे युद्ध न्याय्य, सन्माननीय आणि कायमचे संपवण्याची गरज यावर भर दिला असेल. या प्रकरणात भारताचा प्रभाव आहे असा माझा नेहमीच विश्वास आहे आणि मला आशा आहे की तो ते शहाणपणाने वापरतील.”

राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी फोनवर बोलल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या एक्स वरील पोस्टवर टीप्पणी करताना ग्राहम यांनी हे वक्तव्य केले होते.

मोदी त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले की, “माझे मित्र राष्ट्राध्यक्ष पुतिन” यांच्याशी “खूप चांगले आणि सविस्तर संभाषण” झाले. क्रेमलिनने दिलेल्या माहितीनुसार, पुतिन यांनी मोदींना युक्रेनमधील नवीन घडामोडींबद्दल माहिती दिली आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे विशेष दूत स्टीव्हन विटकॉफ यांच्याशी झालेल्या अलिकडच्या भेटीचीही माहिती दिली.

मोदींनी “युक्रेनच्या सभोवतालची परिस्थिती राजकीय आणि राजनैतिक मार्गांनी सोडवण्याच्या बाजूने भारताच्या अढळ भूमिकेचा” पुनरुच्चार केला आणि या वर्षाच्या अखेरीस २३ व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी पुतिन यांना भारतात आमंत्रित केले.

ग्रॅहम यांनी ट्रम्प यांच्या रशियाच्या तेल खरेदीवर भारतावर अतिरिक्त टॅरिफ लादण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे आणि म्हटले आहे की, “भारतासारख्या देशांना त्यांच्या युद्धातील नफेखोरीची किंमत मोजावी लागणे ही एक चांगली सुरुवात आहे.”