US Tariffs advertisement war begins in India Colgate vs Dabur : कोकाकोला विरुद्ध पेप्सी, मॅक्डॉनल्ड्स विरुद्ध बर्गर किंग, अॅपल विरुद्ध मायक्रोसॉफ्ट, ऑडी विरुद्ध बीएमडब्ल्यू या कंपन्यांमधील जाहिरातयुद्ध लोकप्रिय आहे. आता भारतात दोन टूथपेस्ट कंपन्यांमध्ये जाहिरात युद्ध सुरू झालं आहे. विशेष म्हणजे यातील एक कंपनी भारतीय आहे तर एक अमेरिकन. आयात शुल्कावरून भारत व अमेरिकेत तणाव निर्माण झालेला असताना या भारतीय कंपनीने तिच्या जाहिरातीला देशभक्तीची जोड दिली आहे.
कोलगेट या अमेरिकन टूथपेस्ट कंपनीची भारतातील प्रतिस्पर्धी डाबरने राष्ट्राभिमानाचा मुद्दा घेत कोलगेटवर जाहिरातीच्या माध्यमातून कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच डाबरने भारतीय ग्राहकांना अमेरिकन कंपन्यांपासून दूर राहण्याचं व स्वदेशीचा स्वीकार करण्याचं आवाहन केलं आहे. भारत व अमेरिकेतील व्यापार संघर्षात भारतीय कंपन्या ग्राहकांनी स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याबाबत प्रचार करत आहेत.
डाबरने आपल्या जाहिरातीत कोलगेटचा थेट उल्लेख केलेला नसला तरी जो प्रातिनिधिक फोटो त्यांनी वापरला आहे तो कोलगेटच्या टूथपेस्ट बॉक्ससारखाच आहे. तसेच अमेरिकन झेंड्याच्या रंगात Born there, not here असं देखील जाहिरातीत म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (५ सप्टेंबर) पुन्हा एकदा नागरिकांना स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले मुलांनी परदेशी ब्रँड्सची यादी तयार करावी आणि शिक्षकांनी त्यांना हे ब्रँड्स वापरण्यापासून परावृत्त करावं.
स्वदेशीचा वापर करण्याची मोहीम
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांनी गेल्या आठवड्यात भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर ५० टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लागू केल्यामुळे मोदी समर्थकांनी भारतीय नागरिकांना अमेरिकन ब्रँड्सवर बहिष्कार टाकण्याची व्हॉट्सअॅप मोहीम सुरू केली आहे. यामध्ये मॅकडॉनल्ड्स, पेप्सी व अॅपलसारख्या ब्रँड्सचा समावेश आहे.
११ अब्ज डॉलर्स इतकं मूल्य असलेल्या डाबर कंपनीने देशातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये एक जाहिरात दिली आहे. या जाहिरातीत कोलगेटसारख्या दिसणाऱ्या परंतु नाव नसलेल्या एका टूथपेस्टचे फोटो आहेत. प्रतिस्पर्ध्याचं नाव नमूद न करताना डाबरने आपल्या जाहिरातीतून डाबरने ग्राहकांना विचारलं आहे की “तुम्ही कोणत्या टूथपेस्टची निवड कराल? ‘स्वदेशी निवड कराल का? भारतीयांसाठी भारतात बनवलेली टूथपेस्ट. तसेच तुम्हाला माहितीय का तुमची आवडती टूथपेस्ट ही अमेरिकन आहे.”
दरम्यान, या जाहिरातीबाबत रॉयटर्सने डाबर व कोलगेट या दोन्ही कंपन्यांशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला. यावर डाबरने जाहिरातीवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तर, कोलगेटने कुठल्याही प्रश्नावर उत्तर देणं टाळलं.
भारतात सर्वाधिक विकली जाणारी टूथपेस्ट कोणती
रॉयटर्सच्या अहवालानुसार कोलगेट कंपनीची टूथपेस्ट देशात सर्वाधिक प्रमाणात विकली जाते. देशात विकल्या जाणाऱ्या टूथपेस्टपैकी ४३ टक्के वाटा एकट्या कोलगेटचा आहे. तर, युनिलीव्हर कंपनीची पेप्सोडेन्ट १६ टक्के हिस्सेदारीसह दुसऱ्या स्थानी आहे. डाबरकडे (रेड पेस्ट) भारतीय बाजारात १३ टक्के हिस्सेदारी आहे. तर, पतंजली ९.२ टक्के हिस्सेदारीसह चौथ्या क्रमांकावर आहे.