Scott Bessent on Russian Economy : अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी रविवारी (७ सप्टेंबर) रशियाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, “अमेरिका व युरोपीय महासंघाने रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर कठोर निर्बंध लादले तर रशियाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपाध्यक्ष जे. डी. व्हॅन्स यांनी युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांच्याशी या विषयावर चर्चा देखील केली आहे.
बेसेंट म्हणाले, “आपले अध्यक्ष व उपाध्यक्षांनी मांडलेल्या मुद्द्यांवर युरोपियन आयोगही तितकाच गंभीर आहे. रशियावर दबाव निर्माण करण्यासाठी अमेरिका व युरोपियन महासंघ मिळून काय काय पावलं उचलू शकतात याबाबत आयोगाने इतर काही गोष्टी उपस्थित केल्या.” स्कॉट बेसेंट हे एनबीसी न्यूजशी बोलत होते.
अमेरिकेची भारताकडून ५० टक्के आयात शुल्क आकारणी
ट्रम्प प्रशासनाने भारतावर २५ टक्के परस्पर आयात शुल्क (रेसिप्रोकल टॅरिफ) लागू केलं होतं. त्यानंतर भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे दंडात्मक कारवाई म्हणून अमेरिकेने भारतावर आणखी २५ टक्के असं मिळून एकूण ५० टक्के आयात शुल्क लादलं आहे. २७ ऑगस्टपासून हे आयात शुल्क लागू करण्यात आलं असून अमेरिकन प्रशासनाने याची अंमलबजावणी सुरू केली आहे.
…तर रशियाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल : अमेरिकेचे अर्थमंत्री
अमेरिकेचे अर्थमंत्री म्हणाले, “अमेरिकेला रशियावर दबाव निर्माण करायचा आहे. परंतु, यासाठी आपल्याला युरोपीय देशांचं समर्थन मिळायचा हवं. आता आपल्यासमोर एकच प्रश्न आहे की युक्रेनचं लष्कर आणि रशियाची अर्थव्यवस्था किती काळ टिकून राहते. अमेरिका व युरोपियन महासंघाने रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर अधिक आर्थिक निर्बंध लादले, अतिरिक्त आयात शुल्क लादलं तर रशियाची अर्थव्यवस्था कोसळून जाईल. त्यानंतर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना स्वतःहून पुढे येत बातचीत करावी लागेल.”
ट्रम्प यांच्यांकडून मोदींचं कौतुक
अलीकडेच डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत असल्यामुळे ते भारतावर नाराज आहेत. ते म्हणाले होते, माझे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी खूप चांगले संबंध आहेत. भारताचे पंतप्रधान काही महिन्यांपूर्वी अमेरिकेला देखील आले होते. तेव्हा मी त्यांचं खूप कौतुक केलं होतं. ते माझे चांगले मित्र आहेत, तसेच ते महान नेते देखील आहेत.” ट्रम्प एकीकडे मोदींचं कौतुक करतात, मात्र त्यांच्या भारताबाबतची धोरणं याच्या विपरीत आहेत.
भारताची चिंता वाढली
दरम्यान, बेसेंट यांच्या म्हणण्याप्रमाणे युरोपीय देशांनी देखील रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर आर्थिक निर्बंध लादले किंवा त्यांच्याकडून अधिक आयात शुल्क लादलं तर त्याचा भारताला फटका बसू शकतो. कारण भारत युरोपातील अनेक देशांबरोबर व्यापार करतो. भारतातून युरोपात मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते.