US Vice President J D Vance On Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात काही मोठे निर्णय घेतले आहेत. पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासह सिंधू पाणी करार स्थगित केला. तसेच पाकिस्तानी विमानांसाठी भारताने आपलं हवाई क्षेत्र बंद केलं. भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
भारताकडून पाकिस्तानवर कधीही लष्करी कारवाई केली जाऊ शकते, अशी भीती पाकिस्तानचे मंत्री अत्तातुल्लाह तरार यांनी नुकतीच व्यक्त केली आहे. दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी देखील महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.’जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी पाकिस्तान भारताला सहकार्य करेल अशी अपेक्षा आहे’, असं जेडी व्हान्स यांनी म्हटलं आहे.
जेडी व्हान्स हे फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे. जेडी व्हान्स पुढे म्हणाले की, “मला काळजी वाटते, कारण दोन्ही देश अण्वस्त्रधारी आहेत, त्यामुळे कोणत्याही क्षणी तणाव वाढू शकतो. पण आम्ही भारत आणि पाकिस्तानशी संपर्कात आहोत. आम्हाला आशा आहे की भारत या दहशतवादी हल्ल्याला अशा प्रकारे प्रत्युत्तर देईल की त्यामुळे व्यापक संघर्ष निर्माण होणार नाही. तसेच आम्हाला अशीही अपेक्षा आहे की पाकिस्तान त्यांच्या जबाबदारीनुसार त्यांच्या हद्दीत कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी भारताला सहकार्य करेल”, असं जेडी व्हान्स यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, जेडी व्हान्स यांचं हे विधान अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या विधानांशी सुसंगत आहे. कारण गुरुवारी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने म्हटलं होतं की, अमेरिका दहशतवादाविरुद्ध भारतासोबत खंबीरपणे उभा आहे. पंतप्रधान मोदींना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी भारत आणि पाकिस्तान दोघांनाही दक्षिण आशियात दीर्घकालीन शांतता आणि प्रादेशिक स्थिरता राखण्यासाठी काम करण्याचं आवाहन केलं होतं.