TikTok in US: भारतानं करोना काळातच बंदी आणलेलं TikTok हे अॅप अमेरिकेत मात्र अजूनही चालू आहे. चीनशी व्यापार व इतर सर्वच क्षेत्रांत कडवी स्पर्धा करणाऱ्या अमेरिकेने अद्याप चीनच्या या आघाडीच्या सोशल मीडिया अॅपचा मात्र सुखेनैव वापर चालू ठेवला आहे. आता मात्र अमेरिकेकडून TikTok वर बंदी घालण्याची तयारी केली जात आहे. अमरिकेच्या व्यापार विभागाचे सचिव हॉवर्ड ल्युटनिक यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. पण एकीकडे अमेरिकन सरकारकडून TikTokविरोधात भूमिका घेतली जात असताना खुद्द राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हे अॅप आवडत असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

भारतात बंदी असलेलं TikTok हे रील्सचं अॅप अमेरिकेत चांगलंच लोकप्रिय आहे. जवळपास १४ कोटी अमेरिकन नागरिकांच्या मोबाईल फोन्समध्ये TikTok असून त्याचा वाढता वापरही पाहायला मिळत आहे. मात्र, या अॅपवरील डेटा चीन सरकारकडून वापरला जात असल्याचा दावा केला जात आहे. यामुळेच अमेरिकन सरकारकडून अॅपची मालकी चीनी हातांमध्ये असण्यास विरोध केला जात आहे. याच भूमिकेचा एक भाग म्हणून जानेवारी महिन्यात २४ तासांसाही हे अॅप अमेरिकेत पूर्णपणे बंद करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा अमेरिकेकडून याबाबत आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना TikTok आवडतं!

दरम्यान, अमेरिकन सरकारने टिकटॉकसंदर्भात स्पष्ट भूमिका घेतलेली असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मात्र TikTok आवडत असल्याची माहिती दिली आहे. ल्युटनिक यांनी यासंदर्भात फॉक्स न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये उल्लेख केला आहे. मात्र, त्याचवेळी TikTokबाबत अमेरिकेचा प्रस्ताव चीननं स्वीकारला नाही, तर हे अॅप लवकरच अमेरिकेत बंद होईल, असा इशाराही ल्युटनिक यांनी दिला आहे.

“राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना खरंच TikTok आवडतं. त्यांनी हे वारंवार सांगितलंदेखील आहे. तरुणाईशी संवाद साधण्याचं ते एक चांगलं माध्यम आहे असं ते मानतात. पण आपण हे सत्यदेखील स्वीकारायला हवं की अमेरिकेतल्या १० कोटींहून जास्त फोन्समध्ये तुम्ही चीनी मालकीचं अॅप ठेवू शकत नाहीत. हे शक्य नाही. त्यामुळे हे अॅप अमेरिकन मालकीकडे, अमेरिकन तंत्रज्ञानाआधारित व अमेरिकन नियमावलीनुसार चालवलं जाणंच योग्य राहील”, असं ल्युटनिक म्हणाले.

१७ सप्टेंबरची डेडलाईन!

दरम्यान, अमेरिकेने चीनला यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी १७ सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. याआधीही डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला दिलेली मुदत वाढवली होती. आता यंदा दिलेली मुदत अंतिम असेल, असं अमेरिकेकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे १७ सप्टेंबरपर्यंत TikTok अमेरिकी नियंत्रणाखाली न आल्यास अमेरिकेत त्यावर बंदी जाहीर केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.