नवी दिल्ली : खलिस्तानी फुटीरतावादी गुरपतवंतसिंग पन्नूच्या हत्या करण्याचा कट अमेरिकेने हाणून पाडला. या कटात सहभागाबद्दल अमेरिकेने भारताला इशारा दिला होता, असे वृत्त ‘फायनान्शियल टाइम्स’ने  दिले आहे. कॅनडामध्ये खलिस्तानवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत भारतीय हस्तकांचा हात असल्याची शक्यता कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन  ट्रुडो यांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर पन्नू प्रकरणामुळे नवा वादंग निर्माण होण्याचे संकेत आहेत. ‘‘ ट्रुडो यांनी निज्जर हत्याप्रकरणी भारतावर जाहीर आरोप केल्यानंतर अमेरिकेने पन्नू हत्या कटाच्या प्रकरणाचा तपशील आपल्या मित्रराष्ट्रांच्या गटासमोर मांडला होता. त्यामुळे या घटनांतील साम्यस्थळांमुळे अमेरिका आणि त्यांच्या मित्र देशांत चिंता निर्माण झाली’’, असे ‘एफटी’च्या वृत्तात म्हटले आहे.

हेही वाचा >>> मणिपूरला जायला वेळ नाही, सामना बघायला आहे; प्रियंका गांधींची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जूनमध्ये झालेल्या अमेरिका दौऱ्यानंतर अमेरिकेने भारताकडे या प्रकरणी नाराजी व्यक्त केली. हा कट रचणाऱ्यांना त्यापासून परावृत्त करण्यास भारतास भाग पाडले गेले, की अमेरिकेची तपास यंत्रणा ‘फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ने (एफबीआय) यात हस्तक्षेप करून हा कट हाणून पाडला, हे मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले नाही’’, असा दावा या वृत्तात करण्यात आला आहे. पन्नूकडे अमेरिका आणि कॅनडाचे दुहेरी नागरिकत्व आहे. पन्नू हा खलिस्तान समर्थक फुटीरतावादी गट ‘शिख फॉर जस्टिस’चा म्होरक्या आहे. भारतीय दूतावासातील कर्मचाऱ्यांना तो सातत्याने धमक्या देत असतो. त्याने अलीकडे कॅनडाच्या नागरिकांना ‘एअर इंडिया’च्या विमानांनी प्रवास न करण्याचा इशारा दिला होता. त्यासाठी त्याने खलिस्तानी दहशतवाद्यांनी भारताच्या ‘कनिष्क’ विमानात घडवलेल्या बॉम्बस्फोटाची आठवण करून दिली होती. या दुर्घटनेत तीनशेहून अधिक प्रवासी मृत्युमुखी पडले होते. त्यातील बहुसंख्य कॅनडाचे नागरिक होते.