अमेरिकन लष्कराने अफगाणिस्तान सोडलं, २० वर्षांच्या संघर्षाला पूर्णविराम; बायडेन म्हणाले, “मागील १७ दिवसांमध्ये…”

हमीद करझाई विमानतळावरुन ३० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजून २९ मिनिटांनी अमेरिकेच्या शेवटच्या विमानाने अफगाणिस्तानमधून उड्डाण केलं.

USA
अमेरिकन लष्कराने केली घोषणा (फोटो ट्विटर आणि रॉयटर्सवरुन साभार)

अमेरिकी सैन्य अगाणिस्तानमधून पूर्णपणे माघारी परतलं आहे. याचबरोबर मागील २० वर्षांपासून येथे सुरु असणारा अमेरिकेचा संघर्ष संपल्याची घोषणा करण्यात आली आहे. एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकन कमांडर आणि अमेरिकन राजदूत हे अफगाणिस्तान सोडणारे शेवटचे अमेरिकन नागरिक ठरले. मात्र त्याचवेळी अमेरिकने आम्हाला अपेक्षित संख्येने लोकांना अफगाणिस्तानमधून सुरक्षित स्थळी हलवता आलं नसल्याचं मान्य केलं आहे.  अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय असलेल्या पँटागॉनने अपेक्षित संख्येने लोकांची सुटका करता आली नसल्याचं म्हटलं आहे तर जनरल केंथ मॅकन्झी यांनी संपूर्ण सैन्य मागे घेतल्याची घोषणा केलीय. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे आज अमेरिकेला संबोधित करणार असल्याची घोषणा करण्यात आलीय.

केंथ मॅकन्झी यांनी दिलेल्या माहितीनुसार हमीद करझाई विमानतळावरुन ३० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजून २९ मिनिटांनी (अमेरिकन वेळेप्रमाणे) अमेरिकेच्या शेवटच्या विमानाने अफगाणिस्तानमधून उड्डाण केलं. “अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्य पूर्णपणे मागे घेण्यात आल्याची मी घोषणा करतो. अमेरिकन नागरिक आणि अफगाणिस्तानी लोकांना वाचवण्यासाठी अमेरिकन लष्कराने सुरु केलेलं मदतकार्य पूर्ण झालं आहे. अमेरिकेच्या शेवटच्या सी -१७ विमान हे हमीद करझाई विमानतळावरुन ३० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजून २९ मिनिटांनी उड्डाण केलं आहे.” असं मॅकन्झी म्हणालेत.

तसेच लष्करी मदकार्य संपलं असलं तरी राजनैतिक पद्धतीने अमेरिकन आणि अफगाणी नागरिकांना मदत करणं आम्ही सुरुच ठेवणार असल्याचं मेकन्झी यांनी स्पष्ट केलं आहे. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी “अमेरिकन लष्कराने अफगाणिस्तान सोडल्याच्या बातमीनंतर पहिली प्रतिक्रिया दिलीय. “अफगाणिस्तानमध्ये मागील २० वर्षांपासून असणारी आमच्या सैन्याची उपस्थिती संपुष्टात आलीय. यासाठी मी आमच्या लष्कराच्या कमांडर्सचे आभार मानू इच्छितो की त्यांनी इतक्या धोकादायक वातावरणामध्ये अफगाणिस्तानमधून नियोजित वेळापत्रकाप्रमाणे ३१ ऑगस्टच्या सुरुवातीच्या काही तासांमध्ये संपूर्ण लष्कर मागे घेतलं आणि त्यात अमेरिकन नागरिकांना प्राण गमावावे लागले नाहीत,” असं म्हटलं आहे.

अमेरिकचे संरक्षण विभागाने ही अफगाणिस्तान सोडणाऱ्या अमेरिकन लष्कराच्या शेवटच्या कमांडरचा फोटो ट्विट केलाय. मेजर जनरल क्रिस डोन्ह्यू हे ३० ऑगस्ट रोजी सी-१७ विमानामध्ये चढणारे आणि अफगाणिस्तान सोडणारे शेवटचे अमेरिकन लष्करी अधिकारी ठरले. यासोबतच अमेरिकेचे अफगाणिस्तानमधील मोहीम संपुष्टात आलीय असं या फोटोसहीत दिलेल्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आलं आहे.

बायडेन यांनी मागील १७ दिवसांमध्ये अमेरिकन लष्कराने अमेरिकन ऐतिहासामधील सर्वाधिक संख्येने म्हणजेच १ लाख २० हजार अमेरिकन नागरिक, अफगाणिस्तानमधील सहकारी आणि इतरांना एअरलिफ्ट केलं असल्याची माहिती दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Usa 20 year military presence in afghanistan has ended completion of the withdrawal of us troops from afghanistan scsg