भारत आणि पाकिस्तानात प्रवास करणाऱ्या अमेरिकेतील नागरिकांसाठी यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन ‘लेव्हल वन’ कोविड-१९ नोटीस जारी केली आहे. या अंतर्गत, अमेरिकेतील नागरिकांना भारतात प्रवास करताना पूर्णपणे लसीकरण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ज्या लोकांचे पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे त्यांना कोविड-१९ संसर्गाचा धोका कमी आहे. अशीच नोटीस सीडीसीने पाकिस्तानमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठीही जारी केली आहे.

सीडीसीने पाकिस्तानसाठी लेव्हल टू आणि थ्री ट्रॅव्हल नियमावली जारी केल्या आहेत. सीडीसीने आपल्या नागरिकांना सल्ला दिला आहे की जर त्यांनी पाकिस्तानला जाण्याची योजना आखली असेल तर त्यांनी पुनर्विचार करावा. सीडीसीने नागरिकांना आवाहन केले आहे की पाकिस्तानमध्ये दहशतवाद आणि सांप्रदायिक हिंसाचार शिगेला पोहोचला आहे, त्यामुळे नागरिकांनी प्रवास करण्यापूर्वी दोनदा विचार करावा.

भारतासाठी जारी करण्यात आलेल्या नियमावलीमध्ये अमेरिकेतील नागरिकांना त्यांच्या भारत भेटीदरम्यान दहशतवाद आणि नागरी अशांततेमुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रवास न करण्याचे आवाहन केले आहे.  तसेच सशस्त्र संघर्षाच्या संभाव्यतेमुळे भारत-पाकिस्तान सीमेच्या १० किलोमीटरच्या आत जाऊ नये असे म्हटले आहे.

सीडीसी नियमावलीत म्हटले आहे की, अहवालानुसार, भारतात बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषत: पर्यटनस्थळांवर असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे अमेरिकेतील नागरिकांना सावधगिरी बाळगायला हवी.

तसेच अमेरिकेतील नागरिक पाकिस्तानात जात असल्यास बलुचिस्तान प्रांत आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतात न जाण्याचा सल्ला दिला आहे. या दोन प्रांतात दहशतवाद, अपहरणाच्या घटना झपाट्याने वाढत असून येथे सशस्त्र संघर्ष होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. “दहशतवादी वाहतूक केंद्रे, बाजारपेठा, शॉपिंग मॉल्स, लष्करी प्रतिष्ठान, विमानतळ, विद्यापीठे, पर्यटन स्थळे, शाळा, रुग्णालये, प्रार्थनास्थळे आणि सरकारी सुविधांना लक्ष्य करून, अगदी कमी किंवा कोणतीही चेतावणी देऊन हल्ला करू शकतात,” असे त्यात म्हटले आहे.