Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमधील हापूर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वीज विभागाच्या लाईनमनचा अद्भुत पराक्रम समोर आला आहे. एका पेट्रोल पंपावर हेल्मेट नसल्यामुळे लाईनमनला त्यांच्या दुचाकीमध्ये पेट्रोल नाकारल्यामुळे लाईनमनने थेट पेट्रोल पंपाची वीज खंडीत केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली असून थेट चौकशीचे आदेश दिले आहेत.

नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशातील हापूर शहरातील परतापूर रोडवर असलेल्या एका पेट्रोल पंपावर पेट्रोल खरेदीसाठी एक लाईनमन गेला होता. यावेळी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी लाईनमनला हेल्मेटसंदर्भातील नियम सांगत पेट्रोल भरण्यास नकार दिला. मात्र, आपल्याला पेट्रोल भरण्यास पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी नकार दिल्याचा राग मनात धरून लाईनमनने पेट्रोल पंपाच्या शेजारील इलेक्ट्रिक पोलवर चढून थेट पेट्रोल पंपाची वीज खंडीत केली.

लाइनमनने केलेल्या हा प्रकार पेट्रोल पंपावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या व्हिडीओमध्ये लाइनमनला पेट्रोल भरण्यास नकार दिल्यामुळे त्याने संतप्त होऊन थेट इलेक्ट्रिक पोलवर चढून पेट्रोल पंपाची वीज खंडीत केल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या लाईनमनचा पराक्रमावरून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी हा व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पेट्रोल पंपावरील वीज खंडीत केल्यानंतर पेट्रोल पंपाच्या मालकाने लाइनमनच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर वीज विभागाने या घटनेची गंभीर दखल घेत तातडीने चौकशीचे आदेश दिले. तसेच लाइनमनने पेट्रोल पंपाची वीज खंडीत केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक जिल्हा प्रशासनाने याची दखल घेत कारवाईचे आदेश दिले आहेत. पेट्रोल नाकारल्याने संतप्त झालेल्या लाइनमनने जवळच्या विद्युत खांबावर चढून वीज खंडीत केल्यामुळे पेट्रोल पंपावर पेट्रोलसाठी रांगेत थांबलेल्या अनेक प्रवाशांचीही गैरसोय झाली होती. मात्र, पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर काही तासांनी पुन्हा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. या प्रकरणात लाइनमनवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.