सहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या एका मुलावर २१ वर्षाच्या तरुणीला पैशांसाठी आणि सेक्स चॅटसाठी धमकावल्याचा आरोप आहे. पैसे दिले नाहीत, तर मॉर्फ केलेला फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप या मुलावर आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हा मुलगा शिकतो. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. मुलाने एका टेलिग्राम ग्रुपवरुन तरुणीचा नंबर मिळवल्याचे पोलिसांनी सांगितले.
तरुणीचे बीएससी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले असून ती सध्या सिव्हील सर्व्हिसेसच्या परिक्षेची तयारी करत आहे. तरुणीने मुलाच्या फोनवरुन आलेल्या मेसेजचे १८ स्क्रिनशॉट पोलिसांबरोबर शेअर केले आहेत. आपला फोन कोणीतरी हॅक करुन हे मेसेज पाठवला. आपल्याला याची कल्पना नाही असे मुलाचे म्हणणे आहे.
सात मे रोजी आपल्या मुलीला पहिला मेसेज आला. पण तो अभ्यासासंदर्भात होता असे तरुणीच्या आई-वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे. सुरुवातीला आलेले बहुतांश मेसेज हे अभ्यासासंदर्भात होते. त्याला परिचय वाढवायचा होता असे तक्रारीत म्हटले आहे. यासंबंधी कवी नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
१७ मे रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास मुलीला काही फोटो पाठवले. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ते फोटो घेऊन मॉर्फ करण्यात आलेले होते. आपल्या मुलीने पैसे द्यावे किंवा किंवा सेक्स चॅट करावं अशी मुलाची मागणी होती असे एफआयआरमध्ये म्हटले आहे. कलम ५०७, ३८६ अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्राथमिक तपासातून मुलगा अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. मुलाने आणि त्याच्या पालकांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. कोणीतरी आपला फोन हॅक करुन हे सर्व केलेय असे मुलाचे म्हणणे आहे. पोलीस या प्रकरणी सायबर टीमच्या मदतीने तपास करत आहेत.