निवडणूक लढण्याबाबत अद्याप निर्णय नाही; युवकांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत आपणच काँग्रेसचा चेहरा असल्याचे प्रियंका गांधी वाड्रा यांनी शुक्रवारी स्पष्ट केले, पण ही निवडणूक त्या लढविणार काय, या प्रश्नाचे थेट उत्तर त्यांनी दिले नाही.

उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसच्या युवकांसाठीच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन शुक्रवारी राहुल गांधी आणि प्रियंका यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी ही बाब स्पष्ट केली. राज्यात काँग्रेस सत्तेवर आल्यास युवकांना रोजगार देण्यासाठी काय केले जाईल, याची माहिती जाहीरनाम्यात दिली आहे. 

उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा चेहरा असलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 

उत्तर प्रदेशात काँग्रेसचा चेहरा कोण असणार आहे, असे पत्रकारांनी विचारले असता, प्रियंका यांनी प्रतिप्रश्न केला की, तुम्हाला आणखी कोणाचा चेहहा दिसतो आहे काय? मग… माझा चेहरा सगळीकडे दिसतो तर आहेच ना?

तुम्ही निवडणूक लढविणार आहात काय, कोणत्या मतदार संघातून, या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, ते आम्ही ठरविले की तुम्हाला समजेलच. त्यावर आमचा निर्णय अजून झालेला नाही. 

प्रियंका या अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या उत्तर प्रदेशचा प्रभार असलेल्या महासचिव आहेत.

निवडणुकोत्तर आघाडीचा पर्याय खुला 

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचे निकाल कोणाही एका पक्ष, आघाडीस स्पष्ट बहुमत देणारे नसल्यास निवडणुकीनंतरही आघाडी करणार काय, या प्रश्नावर प्रियंका गांधी म्हणाल्या की, अशी परिस्थिती उद्भवल्यास आम्ही त्यावर विचार करू शकतो. उत्तर प्रदेशातील मतदारांच्या कौलामुळे अशी वेळ आली आणि काँग्रेस पक्ष अशा आघाडीचा घटक बनल्यास आमचा महिला आणि युवकांच्या कल्याणाचा कार्यक्रम यशस्वी करणे हेच आमचे ध्येय असेल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttar pradesh manifesto published the face of congress priyanka gandhi election will fight akp
First published on: 22-01-2022 at 00:13 IST