उत्तर प्रदेशमधील मेरठ जिल्ह्यातील कस्तुरबा गांधी गर्ल्स हायस्कूलमध्ये मुलींना शिक्षणाची संधी मिळते, त्यांच्यातील कलागुणांना वाव दिला जातो…पण रात्र होताच शाळेच्या आवारातील वातावरण बदलते. निवासी शाळेतील वॉर्डन रात्री भूत बनून फिरते आणि मुलींना घाबरवते. इतकच नव्हे तर मुलींचा लैंगिक छळ देखील करते. शाळेतील मुलींनी जिल्हाधिकाऱ्यांना पेन्सिलने लिहीलेल्या पत्रातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार मेरठ जिल्ह्यात कस्तुरबा गांधी गर्ल्स हायस्कूल ही निवासी शाळा असून या शाळेतील वसतीगृहात १०० मुली, दोन शिक्षिका आणि एक वॉर्डन राहते. वसतीगृहातील आठ मुलींनी जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र पाठवले असून या पत्रात त्यांनी वसतीगृहात होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडली. ‘आमच्यासाठी रोजची रात्र ही भीतीदायक असते. वॉर्डनच्या हातात परफ्यूमसारखे द्रव्य असते. आम्ही बेडवर झोपल्यावर रोज आमच्या अंगावर ते द्रव्य शिंपडले जाते. यानंतर वॉर्डन काही तरी पुटपुटते. ती कोणाशी तरी बोलत असते. ती आमचे कपडे काढण्याचा प्रयत्न करते. आम्ही भीतीपोटी डोळे देखील उघडत नाही, आम्ही झोपेत असल्यासारखे बेडवरच पडून असतो’, असे एका १० वर्षांच्या मुलीने पत्रात म्हटले आहे. ती चौथी इयत्तेत शिकते.

सहावी, सातवी आणि आठवीत शिकणाऱ्या मुलींनीही पत्रात गंभीर आरोप केले आहेत. वॉर्डन काही मुलींना रात्री शाळेच्या आवाराबाहेर नेते. मी खोलीत झोपलेली असताना वॉर्डन भूत बनून आली. तिने मला चुकीच्या ठिकाणी स्पर्श केला आणि त्यामुळे मला जाग आली. पण मी काहीच करु शकत नव्हते, असे सातवीच्या मुलीने म्हटले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही मुलींच्या पालकांनी वॉर्डनविरोधात काही दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. मेरठमधील शिक्षण अधिकारी सतेंद्र कुमार यांनी या वृत्तावर प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाची चौकशी करत आहोत. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे सतेंद्र कुमार यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttar pradesh warden dresses up as ghost to scare girls molests them in meerut
First published on: 22-05-2018 at 10:22 IST