scorecardresearch

पावसाच्या थैमानामुळे केदारनाथ यात्रा थांबविली ; उत्तराखंडमध्ये आजही सावधगिरीचा इशारा

हवामान बदलल्याने केदारनाथ देवस्थानाकडे जाणाऱ्या यात्रेकरूंना थांबविण्यात आले आहे.

नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये जोरदार पावसाने थैमान घातल्याने केदारनाथ यात्रा तूर्त थांबविण्यात आली आहे. उत्तराखंड सरकारने सोमवारी ही घोषणा केली. या परिसरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान बदलल्याने केदारनाथ देवस्थानाकडे जाणाऱ्या यात्रेकरूंना थांबविण्यात आले आहे. त्यांना त्यांच्या हॉटेलांकडे परतण्यास सांगण्यात आले आहे. सध्या या ठिकाणची हेलिकॉप्टर सेवा बंद करण्यात आली आहे. 

रुद्रप्रयागचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार यांच्या हवाल्याने एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीत म्हटले आहे की, सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पायी प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंना ते असतील तेथे थांबविण्यात आले असून त्यांना त्यांच्या हॉटेलांकडे परत फिरण्याची विनंती केली जात आहे. सध्या कुणीही मंदिराकडे मार्गक्रमण करू नये आणि सुरक्षित राहावे, असे बजावण्यात आले आहे. सोमवारी दिलेल्या ऑरेंज अलर्टची मुदत मंगळवापर्यंत आहे. गुत्पकाशीपासून सुमारे पाच हजार लोकांना मार्गावर थांबवून परत पाठविले आहे.  

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर पाकिस्तानाकडील भागात उद्भवलेल्या हवामानाच्या स्थितीमुळे पावसाचे ढग तयार झाले असून त्यामुळे उत्तराखंडमध्ये पाऊस होत आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि हिमाचल प्रदेशातही सोमवारी सकाळी हीच स्थिती होती.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Uttarakhand kedarnath yatra halted due to heavy rains zws