US-India Trade Talks : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांचा जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत असल्याचं पाहायला मिळत आहे. ट्रम्प यांनी आतापर्यंत घेतलेल्या निर्णयांपैकी आयातशुल्क धोरणाची मोठी चर्चा आहे. अमेरिकेने आतापर्यंत अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात आयातशुल्क लादलं आहे. भारतावर देखील २५ टक्के आयातशुल्क आणि २५ टक्के अतिरिक्त आयातशुल्क असं एकूण ५० टक्के टॅरिफ लादलं आहे. याचा फटका भारताला सहन करावा लागत आहे.
डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने भारतावर टीका करतानाही पहायला मिळाले. मात्र, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी चीनचा दौरा केला आणि त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताबाबत बोलण्याचा सूर बदलल्याचं चित्र पाहायला मिळालं. यातच ट्रम्प यांनी मोदींना फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यामुळे भारत आणि अमेरिकेत लवकरच व्यापार करार होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मात्र, असं असलं तरी ट्रम्प भारतावरील अतिरिक्त टॅरिफ हटवणार का? असा सवाल उपस्थित केला जात होता.
याबाबत आता भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी मोठं भाष्य केलं आहे. ‘अमेरिकेने भारतावर लादलेल्या काही आयातींवर लादलेला दंडात्मक कर ३० नोव्हेंबरनंतर मागे घेतला जाईल’, असा दावा व्ही. अनंत नागेश्वरन यांनी केला आहे. त्यामुळे भारत-अमेरिका व्यापार निर्बंधांमध्ये शिथिलता येण्याची शक्यता आहे. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.
व्ही. अनंत नागेश्वरन यांनी काय म्हटलं?
कोलकाता येथील एका आयोजित कार्यक्रमात बोलताना व्ही. अनंत नागेश्वरन म्हणाले की, “अमेरिकेने भारतावर लादलेल्या आयातशुल्कबाबत बोलण्यासाठी मी थोडा वेळ घेईन. पण, २५ टक्के परस्पर शुल्क आणि २५ टक्के अतिरिक्त कर दोन्ही अपेक्षित नव्हते. मला अजूनही वाटतं की काही राजकीय परिस्थितीमुळे २५ टक्के अतिरिक्त कर लागू झाला असेल. मात्र, गेल्या काही आठवड्यांतील घडामोडी पाहिल्या तर मला असं वाटतं की ३० नोव्हेंबरनंतर अतिरिक्त कर राहणार नाही. मला विश्वास आहे की पुढच्या काही महिन्यांत दंडात्मक शुल्कावर आणि परस्पर शुल्कावर एक तोडगा निघेल.”
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सहकारी नेत्यानेही केला होता मोठा दावा
डोनाल्ड ट्रम्प यांचे सहकारी तथा व्हाईट हाऊसचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी अमेरिका-भारत व्यापार कराराबाबत नुकताच एक दावा केला होता. ‘भारत वाटाघाटीच्या टेबलावर आहे’, असं पीटर नवारो यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या दाव्यामुळेडोनाल्ड ट्रम्प नरमले का? अशी चर्चा आता रंगल्याचंही पाहायला मिळालं. दरम्यान, पीटर नवारो यांच्या या विधानामुळे भारतावरील टॅरिफ कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.