बेहिशेबी संपत्तीप्रकरणी अण्णाद्रमुक पक्षाच्या सरचिटणीस व्ही. शशिकला यांची बुधवारी तुरूंगात रवानगी केल्यानंतर आता त्यांच्या जेलमधील वास्तव्याच्या सुरस कथांची चर्चा रंगली आहे. बेंगळुरूच्या पराप्पना अग्रहरा तुरूंगात आता त्यांची ओळख कैदी क्रमांक ९३२४ अशी आहे. मात्र, शशिकला यांच्यासाठी ही नवी ओळख खडतर जीवनप्रवासाची सुरूवात ठरली आहे. तुरुंगातील पहिल्या रात्री त्यांना जमिनीवर झोपावे लागले. यापूर्वी २०१५ मध्ये अण्णाद्रमुकच्या दिवंगत सर्वेसर्वा जयललिता यांच्यासोबत शशिकला यांनी २१ दिवस तुरूंगात काढले होते. मात्र, यावेळची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. गेल्यावेळी जयललिता व शशिकला चेन्नईहून तुरूंगात आल्या तेव्हा तुरूंगाबाहेर त्यांच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती. मात्र, यावेळी तुरूंगाबाहेर असणारी मोजक्याच समर्थकांची उपस्थिती बरेच काही सांगून जाणारी होती.

शशिकला यांनी न्यायालयापुढे आत्मसमर्पण करण्यापूर्वी तुरूंग प्रशासनापुढे काही मागण्यांची यादी सादर केली होती. आपल्याला तुरूंगात पहिल्या दर्जाच्या कोठडी मिळावी, ही शशिकला यांची प्रमुख मागणी होती. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावल्यामुळे शशिकला यांना दुसऱ्या कैद्याबरोबर कोठडीत राहावे लागत आहे. याशिवाय, शशिकला यांनी ध्यानधारणा आणि चिंतनासाठी जागा उपलब्ध करून द्यावी आणि वेळ पडल्यास कधीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. पहिल्या दर्जाच्या कोठडीमध्ये कैद्यांना टिव्ही, घरचे खाणे आणि आठवड्यातून दोनवेळा मांसाहारी जेवण दिले जाते. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, शशिकला यांनी सकाळच्या न्याहरीसाठी टॅमरिन राईस व चटणी हा मेन्यू निवडला आहे. शशिकला यांनी आज सकाळी काहीवेळ ध्यानधारणा केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तुरूंगात शशिकला यांनी कोणतीही विशेष वागणूक दिली जाणार नाही. त्यामुळे आयुष्यातील अर्ध्याहून अधिक काळ ऐषोआरामात काढणाऱ्या शशिकला यांना पुढची चार वर्षे एक पंखा, एक ब्लँकेट व एका ऊशीसह लहानश्या जागेत घालवावी करावी लागणार आहेत. तसेच तुरूंगावासाच्या काळात शशिकला यांना मेणबत्त्या आणि अगरबत्त्या बनिवण्याचे काम देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना दिवसाला ५० रूपये मजुरी दिली जाईल. मात्र, या कामासाठी आठवड्यात त्यांना एकही सुट्टी मिळणार नाही.

शशिकला यांनी तुरूंग प्रशासनाकडे मागितल्या होत्या या  सुविधा.

१. पलंग आणि टीव्ही द्यावा
२. हातात बेडया घालू नये
३. एक सेवक द्यावा
४. घरचे जेवण द्यावे
५. वेस्टर्न टॉयलेट
६. २४ तास गरम पाणी
७. २४ तास मिनरल वॉटर
८. मेडीटेशनसाठी वेगळी जागा
९. आठवड्यातून दोन वेळा मांसाहार
१०. वैद्यकीय सुविधा