माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतणी करुणा शुक्ला यांनी गतवर्षी भाजपमधून राजीनामा दिल्यानंतर आज(गुरुवार) त्यांनी अधिकृतरित्या काँग्रेसमध्ये प्रवेश केला.  
नरेंद्र मोदींची भाजपच्या पंतप्रधानपदावर झालेली नियुक्ती घटनात्मक नसल्याची टीका करणाऱया करुणा शुक्ला यांनी पक्षात मानसिक छळ होत असल्याचे कारण देत पक्षातून काढता पाय घेतला होता. परंतु, आगामी निवडणुकात तिकीट मिळणार नसल्याचे संकेत मिळाल्यामुळे त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात होती. आज त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून भाजपला धक्का दिला आहे.
करुणा शुक्ला याआधी जंजगीरमधून खासदारपद भूषविले आहे. तसेच २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीतही कोरबा मतदारसंघातून भाजपकडून त्या लढल्या होत्या परंतु, यात त्यांना पराभवाला समोरे जावे लागले होते.