लखनऊ : गेली दोन वर्षे तुरुंगात असलेले समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आझम खान यांची मंगळवारी जामिनावर सुटका करण्यात आली. त्यांचे स्वागत करण्यासाठी सितापूर जिल्हा तुरुंगाबाहेर त्यांचा मुलगा अदीब खान, पक्षाचे राष्ट्रीय सचिव अनुप गुप्ता, खासदार रुची विरा, जिल्हा अध्यक्ष छत्रपती यादव यांच्यासह शेकडो पक्ष कार्यकर्ते सकाळपासून जमा झाले होते. यावेळी तुरुंगाबाहेर जमलेल्या पत्रकारांना आझम खान यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

खान यांच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर तुरुंगाबाहेर तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाकडून परिसरात वाहनांना प्रतिबंध करण्यात आला होता. मात्र तरी कार्यकर्त्यांनी वाहनांसह प्रवेश केल्याने तेथे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.

आमचा न्यायसंस्थेवर विश्वास आहे. मात्र आझम खान यांच्याइतका देशात आतापर्यंत कोणाही राजकीय नेत्याचा छळ झालेला नाही, असे सांगत खासदार विरा यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला. उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागातील रामपूर जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसरात खान कुटुंबीयांचे मोठे वर्चस्व असून त्यांच्यावर विविध प्रकरणांत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

दरम्यान, आझम खान यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेले खटले पूर्णपणे खोटे असून समाजवादी पक्ष सत्तेवर आल्यानंतर ते सर्व खटले मागे घेण्यात येतील, असे पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सांगितले. खान हे फक्त पक्षाचे संस्थापक नाहीत, तर राज्यात समाजवादी चळवळीत मोठे योगदान देणारे मुख्य नेते आहेत, असेही त्यांनी पत्रकारांना सांगितले.

पक्षांतराच्या केवळ अफवा

दरम्यान, आझम खान हे बहुजन समाज पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेवर समाजवादी पक्षाचे नेते शिवपाल यादव यांनी पूर्णविराम लावला. पक्षाचे संस्थापक सदस्य खान यांच्या पक्षांतराच्या चर्चा ही केवळ अफवा असून ती पसरवण्यामागे कोण आहे, याची कल्पना सर्वांना असेलच, असे यादव म्हणाले.

तरी भाजपचा विजय निश्चित

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्या यांनी आझम यांच्या सुटकेनंतर एक्स समाजमाध्यमावर म्हटले की, खान समाजवादी पक्षातच राहिले किंवा बहुजन समाज पक्षात गेले, तरी २०२७ मध्ये दोन्ही पक्षांचा पराभव निश्चित आहे.