फेब्रुवारी२०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय नौदलाच्या वेगवान हालचालींसह इतर अनेक महत्वपूर्ण मोहिमांची देखरेख समर्थपणे पार पाडणारे भारतीय नौदलाचे सहनौसेनाध्यक्ष व्हाईस अ‍ॅडमिरल मुरलीधर सदाशिवराव पवार सुमारे चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ आणि गौरवपूर्ण कारकीर्दीनंतर ३१ मे २०२१ रोजी निवृत्त झाले होते. दरम्यान नौसेनेच्या या मराठी अधिकाऱ्याला त्यांच्या उत्कृष्ठ सेवेबद्दल, खास करून पुलवामा हल्ल्यानंतर सर्व सैन्यदल अलर्ट असतांना नौसेनेला कुठल्याही परीस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज ठेवल्याबद्दल राष्ट्रपतींनी परम विशिष्ट सेवा मेडल देत गौरविले आहे. 

आपल्या कार्यकाळात त्यांनी भारत-चीन दरम्यान गलवान खोऱ्यात उद्भवलेल्या संघर्षपूर्ण परिस्थितीसह इतरही अनेक महत्वपूर्ण प्रसंग हाताळले. त्यांनी १ फेब्रुवारी २०१९रोजी सहनौसेनाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला होता.

मुरलीधर पवार यांच्याविषयी…

व्हाईस अ‍ॅडमिरल पवार हे पुण्याजवळील खडकवासल्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे स्नातक होते. तेथील प्रशिक्षण पूर्ण करून ते ०१ जुलै १९८२ रोजी भारतीय नौदलात अधिकारी म्हणून रुजू झाले. नौदलाच्या प्राथमिक प्रशिक्षणात “सर्वोत्कृष्ट स्नातक (कॅडेट)” हा बहुमान त्यांना मिळालाच, पण नंतर सुमारे वर्षभराच्या सब-लेफ्टनंट ट्रेनिंग कोर्समध्येसुद्धा ते अव्वल क्रमांकावर राहिले. त्यानंतर नौचालन व दिग्दर्शन या विषयात विशिष्ट प्राविण्य मिळवितानाच अत्यंत स्पर्धात्मक व प्रतिष्ठित अशा या अभ्यासक्रमात ते पुन्हा प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले.

अ‍ॅडमिरल पवार यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सेवाकाळात स्टाफ आणि कमांड असे दोन्ही प्रकारचे अनेक आव्हानात्मक पदभार यशस्वीपणे पूर्ण केले. त्यांना सुमारे पंचवीस वर्षांहून अधिक काळ नौदलातील विविध नौकांवर – विमानवाहू नौकेसहित – काम करण्याचा अनुभव आहे. 

ऑपरेशन पवन या श्रीलंकेतील भारतीय शांतिसेनेच्या मोहिमेदरम्यान ते भारतीय नौदलाचे लँडिंग शिप टॅंक (लार्ज) या प्रकारच्या महाकाय अशा मगर नावाच्या जहाजाचे नौचालन अधिकारी होते. तर कारगील युद्धादरम्यान ते पश्चिम आरमारी तांड्याचे (Western Fleet) फ्लीट नौचालन अधिकारी होते. ते वेस्टर्न फ्लीटच्याच फ्लीट ऑपरेशन्स ऑफिसरपदाचा कार्यभार सांभाळीत असतानाच भारतीय नौदलाने एडनच्या आखातात समुद्री चाच्यांविरुद्ध मोहीम सुरू केली होती.

क्षेपणास्त्र प्रक्षेपण नौका नाशक चे ते पहिले कमांडींग ऑफिसर होते. त्याशिवाय त्यांनी नंतर क्षेपणास्त्र प्रक्षेपण कॉर्वेट कुठार व तलवार या फ्रिगेटचेही कमांडींग ऑफिसर म्हणून कुशल सारथ्य केले. मॉरिशसला प्रतिनियुक्तीवर गेल्यानंतर सुरुवातीला ते मॉरिशस नॅशनल कोस्ट गार्डच्या व्हिजिलंट या जहाजाचे कमांडींग ऑफिसर होते. नंतर त्यांची नेमणूक मॉरिशस नॅशनल कोस्ट गार्डचे कमांडंट (प्रमुख) म्हणून करण्यात आली.

त्यांच्या त्रिदलीय सेवाकाळात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत अध्यापक व एकीकृत संरक्षण मुख्यालयात डेप्युटी असिस्टंट चीफ ऑफ इंटेग्रेटेड डिफेन्स स्टाफ (मॅरिटाईम) म्हणून काम केल्याचा अनुभव समाविष्ट आहे.

ध्वजाधिकारी (फ्लॅग ऑफिसर) म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांनी फ्लॅग ऑफिसर सी ट्रेनिंग, दक्षिण नौसेना मुख्यालयाचे चीफ ऑफ स्टाफ, आणि फ्लॅग ऑफिसर कमांडींग महाराष्ट्र व गुजरात क्षेत्र ही पदे भूषविली आहेत.

व्हाईस अ‍ॅडमिरल म्हणून पदोन्नती झाल्यानंतर त्यांनी भारतीय नौदलाचा सर्वात मोठा तळ सी बर्ड (कर्नाटकातील कारवारस्थित भारतीय नौदलाचा सर्वात मोठा पायाभूत प्रकल्प) चे महानिदेशक म्हणून काम पाहिले. नंतर ते पूर्व नौसेना मुख्यालयात चीफ ऑफ स्टाफ म्हणून रुजू झाले.

सहनौसेनाध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळताना त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्वपूर्ण मोहिमा पार पडल्या. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय नौदलाने केलेल्या गतिमान हालचाली, अमेरिका आणि इराण यांच्यातील  संघर्षप्रसंगी पर्शियन आखातात आणि भारत-चीन दरम्यानच्या गलवान संघर्षप्रसंगी भारतीय नौदलाने हाती घेतलेल्या मोहीमा यांचा त्यात समावेश होतो.

नैसर्गिक आपदांच्या प्रसंगी भारतीय नौदलाने भारतात आणि भारताबाहेर हाती घेतलेल्या अनेक मानवतावादी सहाय्य व आपत्ती निवारण (HADR) मोहिमांही त्यांच्या देखरेखीखाली पार पडल्या. कोव्हीड१९ च्या महामारीच्या काळात देशातील व देशाबाहेरील लोकांसाठी नौदलाने हाती घेतलेल्या ऑपरेशन समुद्रसेतु १ व २, तसेच इतर अनेक सागर मोहिमासुद्धा त्यांच्याच देखरेखीखाली पार पडल्या.

इंग्लंडच्या रॉयल नेव्हल स्टाफ कॉलेज, मुंबईच्या कॉलेज ऑफ नेव्हल वॉरफेअर, व दिल्लीच्या नॅशनल डिफेन्स कॉलेजचे स्नातक म्हणून त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली व या प्रत्येक ठिकाणी ते पारितोषिकांचे मानकरी ठरले – ज्यात रॉयल नेव्हल स्टाफ कॉलेज, ग्रीनीच इथल्या प्रतिष्ठित हर्बर्ट लॉट परितोषिकाचाही समावेश होतो.

अ‍ॅडमिरल पवार यांनी मुंबई व मद्रास विद्यापीठातून संरक्षण व सामरिक क्षेत्रातील अभ्यासक्रम पूर्ण करून एम फिलच्या दोन पदव्या मिळविल्या आहेत. त्यांना १९९८ मध्ये भारतीय नौसेनाध्यक्षांचे प्रशस्तीपत्र, २००३मध्ये मॉरिशसच्या पोलीस आयुक्तांचे प्रशस्तीपत्र, २०१०मध्ये विशिष्ट सेवा पदक, २०१६मध्ये अतिविशिष्ट सेवा पदक आणि २०२१मध्ये परमविशिष्ट सेवा पदक हे बहुमान मिळाले आहेत.