Vice President Election Date : संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झाल्याच्या दिवशीच मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या होत्या. जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा अचानक राजीनामा दिला होता. त्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान, जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर नवे उपराष्ट्रपती कोण होणार? कोणाला उपराष्ट्रपती पदाची संधी मिळणार? तसेच उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक कधी होणार? असे सवाल उपस्थित केले जात आहे.

दरम्यान, आता केंद्रीय निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी तारखांची घोषणा केली आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने आज (१ ऑगस्ट) जाहीर केला आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी ९ सप्टेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

निवडणुकीचं वेळापत्रक कसं आहे?

-निवडणूक आयोगाची ७ ऑगस्ट २०२५ रोजी अधिसूचना जारी होईल.

-नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २१ ऑगस्ट २०२५ असेल.

-नामांकन अर्ज छाननीची तारीख २२ ऑगस्ट २०२५ असेल.

-उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०२५ असेल.

-मतदानाची तारीख ९ सप्टेंबर २०२५ असेल आणि त्यानंतर मतमोजणी होईल.

जगदीप धनखड यांनी का दिला राजीनामा?

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. खरं तर धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं असलं तरी त्यांच्या राजीनाम्यावरून राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. जगदीप धनखड यांनी स्वत:हून राजीनामा दिला की त्यांना राजीनामा द्यायला लावला? असे अनेक सवाल विरोधकांकडून विचारले जात आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जगदीप धनखड यांनी राजीनामा पत्रात काय म्हटलं होतं?

२१ जुलै २०२५ रोजी जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला. “प्रकृतीची प्राधान्यानं काळजी घेण्याचा वैद्यकीय सल्ला मला देण्यात आल्यानं मी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देत आहे. राज्यघटनेच्या कलम ६७ (अ)अंतर्गत मी स्वेच्छेनं हा निर्णय घेतला आहे,” असं त्यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं. मात्र, त्यांनी आरोग्य स्थितीबाबत कोणतीही विशिष्ट माहिती उघड केलेली नाही. धनखड यांनी आपल्या राजीनाम्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्रिमंडळातील सहकारी आणि खासदारांचे आभार मानले, तसेच आपल्या कार्यकाळात लाभलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती.