देशाच्या १७ व्या उपराष्ट्रपती पदी सी. पी. राधाकृष्णन यांना एनडीएने उमेदवारी दिली आहे. तर बी. सुदर्शन रेड्डी हे इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत. यासंदर्भातल्या निवडणुकीची प्रक्रिया सकाळी १० वाजता सुरु झाली आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत हे मतदान होईल. मतदान सुरु होण्याआधी एनडीएच्या सगळ्या खासदारांनी सकाळी ९.३० ला ब्रेकफास्ट मिटिंगमध्ये सहभाग घेतला. लोकसभेचे ५४२ आणि राज्यसभेचे २३९ खासदार मतदान करणार आहेत. संध्याकाळी सहा वाजता मतमोजणी सुरु होईल.
चिराग पासवान काय म्हणाले?
केंद्रीय मंत्री चिराग पासवान म्हणाले, “एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन यांचा विजय होईल. कारण आमची मतं तर त्यांना मिळणारच आहेत. शिवाय इंडिया आघाडीच्या काही खासदारांनीही त्यांना मतं दिली आहेत. कारण त्यांनी त्यांच्या आत्म्याचा आवाज ऐकला आहे. त्यामुळे मोठ्या फरकाने विजय मिळवत सी. पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जिंकतील.”
अनेक दिग्गजांनी आत्तापर्यंत केलं मतदान
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक दिग्गजांनी मतदान केलं आहे. आता नेमकं या होणार? विजयी कोण होईल हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
अखिलेश यादव यांची भाजपावर टीका
वापरा आणि फेकून द्या ही भाजपाची नीती आहे. भाजपाची ही नीती सगळ्या देशाला आता समजली आहे. आधी वापरुन घ्यायचं आणि मग बरबाद करायचं हेच भाजपाचं काम आहे. आमचेच उमेदवार जिंकून येतील हा विश्वास आम्हाला आहे असंही यादव म्हणाले.