तालिबानच्या बोलण्यात आणि कृतीत फरक असल्याचे हे आता सिद्ध होत आहे. अफगाणिस्तान ताब्यात आल्यानंतर तालिबानने लोकांना घाबरू नका असे आवाहन करत माध्यमांचे स्वातंत्र्य जपण्याची हमी दिली होती. मात्र, हळूहळू तालिबानचे खरे रुप समोर येत आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका टीव्ही पत्रकाराला जबरदस्तीने तालिबानची स्तुती करण्यास सांगितले जात आहे.

मसिह अलिनेजाद या एका महिला पत्रकाराने हा व्हिडिओ समोर आणला आहे. घाबरू नका! अफगाणिस्तानातील न्यूज अँकरचे हे शब्द होते. दोन सशस्त्र तालिबानी टीव्ही पत्रकाराच्या मागे स्टुडिओमध्ये उभे होते. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असूव आता तालिबानच्या मुक्त माध्यमांच्या आश्वासनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मेसील अलिनेजाब या पत्रकाराने हा व्हिडीओ ट्विट करत “हे अतिवास्तववादी आहे. तालिबानी दहशतवादी या टीव्ही होस्टच्या मागे बंदुका घेऊन उभे आहेत आणि त्याला सांगत आहेत की अफगाणिस्तानच्या लोकांनी इस्लामिक अमिरातला घाबरू नये. तालिबान लाखो लोकांच्या मनात भीतीचा निर्माण करत असल्याचा हा अजून एक पुरावा आहे,” असे म्हटले आहे.

तालिबानने १५ ऑगस्ट रोजी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यापासून पत्रकारांना लक्ष्य केल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. तालिबानने देशात माध्यमे मुक्तपणे चालवण्याची परवानगी दिली असल्याचे सांगितले होते. मात्र आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सत्य परिस्थिती समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी, टोलो न्यूजसोबत काम करणाऱ्या एका अफगाण रिपोर्टर आणि एका कॅमेरामनला काबुलमध्ये तालिबान्यांनी मारहाण केली होती. गरिबी आणि बेरोजगारीचं वृत्तांकन करतो म्हणून तालिबानकडून पत्रकाराला बेदम मारहाण करण्यात आली होती. तसेच तालिबान्यांनी राजधानी काबूल आणि जलालाबाद नांगरहार प्रांतात पत्रकारांवर हल्ला केल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.

दरम्यान, तालिबानी प्रवक्त्याची मुलाखत घेणाऱ्या अफगाणी महिला अँकरनं देश सोडल्याची माहिती समोर आली आहे. अफगाणिस्तानमधील टोलो न्यूज चॅनेलनं १७ ऑगस्टला तालिबान प्रवक्ता मौलवी अब्दुलहक हेमाद याची मुलाखत घेतली होती. ही मुलाखत घेणारी महिला अँकर बेहेशता अरघंद नंतर चांगलीच चर्चेत आली होती. तालिबानच्या प्रतिनिधीची थेट टीव्हीवर महिला अँकरने बसून मुलाखत घेण्याची ही पहिलीच वेळ होती. तालिबानी प्रवक्त्याची निर्भिडपणे मुलाखत घेणाऱ्या २४ वर्षीय बेहेशताने तालिबानच्या भीतीने देश सोडला आहे.