कर्नाटकमधील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक बिबट्या एका घराचे कुंपण ओलांडून अंगणात शिरतो आणि घरातील पाळीव कुत्र्याची शिकार करताना दिसत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनेच हा व्हिडिओ ट्विट केला आहे.
शिमोगा जिल्ह्यातील तीर्थहल्ली येथे घडलेला हा थरारक घटनाक्रम १४ सप्टेंबरचा असल्याचे समजते. बिबट्या घराभोवती असणाऱ्या कुंपणाच्या काही फूट उंच भितींजवळ येऊन थांबतो. त्यानंतर उडी मारुन तो आतमध्ये शिरतो. थोडावेळ हा बिबट्या घराच्या अंगणामध्ये भटकतो. काही वेळाने तो तोंडात आपली शिकार म्हणजेच घरातील पाळवी कुत्रा घेऊन कुंपणाच्या त्याच भिंतीवरुन उडी मारुन बाहेर येताना या व्हिडिओत दिसतो. हा थरारक घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
#WATCH Karnataka: A leopard entered a house and took away the owner’s dog in Thirthahalli of Shivamogga district, yesterday. pic.twitter.com/z7H736ax51
— ANI (@ANI) September 15, 2019
हा व्हिडिओ एएनआयने पोस्ट केल्यानंतर त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘बिबट्या वसाहतीमध्ये शिरलेला नाही तर मनुष्य त्यांच्या परिसरात शिरला असून त्याने तेथे घरे बांधली आहेत,’ असं मत एका नेटकऱ्याने व्यक्त केले आहे. कर्नाटकमध्ये अशाप्रकारे घरामध्ये शिरुन पाळीव प्राण्यांवर हल्ला करण्याची ही काही पाहिलीच वेळ नाही. याआधीही जानेवारी महिन्यामध्ये हुलीयुर्दूरला गावात बिबट्याने घराच्या अंगणात प्रवेश करुन कुत्र्याची शिकार केली होती.