मोदी सरकार २०१४ मध्ये सत्तेत आल्यापासून त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. हे सरकार उद्योगपतींचं सरकार असल्याची टीकाही त्यांच्यावर सातत्याने केली जाते. अदाणी आणि अंबानी या दोन उद्योगपतींना फायदेशीर ठरतील, असे निर्णय घेतले जाता, असा थेट आरोपही केला जातो. अनेक राज्यातीतल प्रकल्प गुजरातला गेल्यामुळेही मोदींना लक्ष्य केलं गेलं आहे. त्यामुळे मोदी सरकार फक्त उद्योगपतींचं सरकार आहे, या आरोपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. तमिळनाडूतील एका वृत्तवाहिनीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते.

मोदी म्हणाले, “तुम्ही जर पंडित नेहरूंचा कालखंड पाहिला किंवा काँग्रेसचा कालखंड पाहिला, तर आपल्या देशात एका विशिष्ट पद्धतीने गोष्टी सांगितल्या जातात. विरोधी पक्षातले लोक तेव्हा सातत्याने त्यावर बोलायचे. डाव्या पक्षाचे लोक आडून बोलायचे. ते म्हणायचे हे टाटा-बिर्लांचं सरकार आहे. संसदेतही नारे लागायचे की हे टाटा-बिर्लांचं सरकार चालणार नाही वगैरे. हा एक आजार आहे. दीर्घ काळापासून तो चालत आला आहे. ही यांची वैचारिक दिवाळखोरी आहे. पण विशेष म्हणजे ज्या काँग्रेस पक्षाला या टीकेचा सामना करावा लागत होता, तोच पक्ष आता ही अशी टीका करत आहे. त्यामुळे काँग्रेस कुठून कुठे पोहोचली आहे, हे यावरून लक्षात येतं.”

“विरोधकांच्या या आरोपांचं उत्तर तर्कानं द्यायचं की तथ्यांच्या आधारे द्यायचं? तर्काच्या आधारे मी उत्तर देऊ शकतो. त्यातून यांचा सगळा दावाच मी पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकतो. पण मी फक्त तथ्य समोर ठेवतो. त्यावरून लोकांनी ठरवावं की हे सरकार कुणाचं आहे”, असं मोदी म्हणाले.

हेही वाचा >> Video: तपास यंत्रणांच्या गैरवापराबाबत नरेंद्र मोदींना थेट प्रश्न; उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले…

“या देशात कोविडपासून आजतागायत ८० कोटी लोकांना मोफत धान्य दिलं जातं. ते सगळे काय माझ्या देशाचे श्रीमंत लोक आहेत का? उद्योगपती आहेत का? या देशात ५० टक्के लोक असे होते ज्यांचं बँकेत खातं नव्हतं. मोदींनी त्यांचं बँकेत खातं उघडून दिलं. हे काय श्रीमंतांचं, उद्योगपतींची खाती होती का? या देशात अडीच कोटींपेक्षा जास्त कुटुंबं अशी होती, ज्यांच्या घरात वीज नव्हती. ते रॉकेलवरच्या दिव्यांवर आयुष्य काढत होते. २०१४ पर्यंत हीच परिस्थिती होती. मी त्या अडीच कोटी घरांपर्यंत वीज पोहोचवली आहे. ही काय श्रीमंतांची घरं होती का? देशातल्या आया-बहिणींना शौचालयांच्या अभावामुळे मोठा त्रास सहन करावा लागत होता. एक तर सूर्योदयाच्या आधी जावं लागायचं लोटा घेऊन किंवा सूर्यास्तानंतर जावं लागायचं. त्या आया-बहिणींचं दु:ख मी पाहिलं आणि ११ कोटींहून जास्त शौचालयं बांधली. उत्तर भारतात तर त्याला इज्जतघर म्हणतात. कारण त्यातून महिलांना सन्मान मिळाला”, असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर टीका केली.

“महिला बचत गट काय उद्योगपतींचे असतात का? १० कोटी महिला या गटांशी जोडल्या गेल्या आहेत. माझं टार्गेट आहे की ३ कोटी अशा महिलांना मी लखपती दीदी बनवेन. हे उद्योगपती आहेत का? आयुषमान भारत योजनेच्या माध्यमातून देशातल्या ५० कोटी लोकांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांची व्यवस्था करण्यात आली. हे लोक श्रीमंत आहेत का?” असा उपरोधिक सवालही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.