बिहारमध्ये शनिवारी पार पडलेल्या दिघा-सोनेपूर रेल्वेमार्गाच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थितांना एक अनोखा प्रकार पहावयास मिळाला. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार भाषणासाठी उभे राहिल्यानंतर उपस्थित जनसमुदाय मोदीनामाचा गजर करत होता. नितीश कुमारांचे भाषण सुरू झाल्यानंतरही लोक मोदी मोदी घोषणा द्यायचे थांबत नव्हते. त्यामुळे साहजिकच नितीश कुमारांना भाषण करताना व्यत्यय येत होता. ही गोष्ट ध्यानात येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी खुर्चीवरून उठून पुढे आले आणि त्यांनी जनसमुदायाला शांत बसण्याचे आवाहन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उपस्थितीत आज दिघा-सोनेपूर रेल्वेमार्ग आणि पुलाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नितीश यांनी वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले.