Akhilesh Yadav Crossing Barricades Video: सोमवारी सकाळी नवी दिल्लीत इंडिया आघाडीच्या नेत्यांचा संसदेपासून भारतीय निवडणूक आयोगापर्यंतचा मोर्चा पोलिसांनी रोखल्यानंतर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेडवरून उडी मारून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. अखिलेश यादव यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
बिहारमधील मतदार याद्यांच्या विशेष सखोल तपासणीला तीव्र विरोध दर्शवत आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचे गंभीर आरोप करत इंडिया आघाडीचे खासदार निवडणूक आयोगाविरुद्ध निषेध मोर्चा काढत आहेत. यावेळी दिल्ली पोलिसांनी नेत्यांचा मार्ग रोखण्यासाठी अनेक बॅरिकेड्स उभारले होते. दरम्यान, निर्बंध असूनही अखिलेश यादव आणि इतर अनेक नेते त्यावरून उडी मारून पुढे जाण्याचा प्रयत्न करताना दिसले.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार अखिलेश यादव, इंडिया आघाडीच्या नेत्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेड्सवर चढताना आणि त्यानंतर त्यावरून उडी मारत असल्याचे दिसत आहे.
धरणे आंदोलनादरम्यान केंद्र सरकारवर टीका करताना समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव म्हणाले, “ते आम्हाला रोखण्यासाठी पोलिसांचा वापर करत आहेत.”
दरम्यान, संसदेपासून भारतीय निवडणूक आयोगापर्यंत निघालेल्या या मोर्चात इंडिया आघाडीच्या नेत्यांसोबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवारदेखील उपस्थित होते.
संसदेच्या मकर द्वारापासून ही निदर्शने सुरू झाली, ज्याचे नेतृत्व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले. खासदारांनी निवडणूक सदन येथील निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे कूच करत असताना त्यांनी निवडणूक आयोगावर “मत चोर” असल्याचा आरोप करत घोषणाबाजी केली.
पण दिल्ली पोलिसांनी हस्तक्षेप करत विरोधी पक्षांच्या खासदारांचा मार्ग अडवला आणि त्यांना निवडणूक आयोगाच्या परिसरात पोहोचण्यापासून रोखले.
मोर्चात सहभागी झालेल्या समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांनी उत्तर प्रदेशातील अलिकडच्या पोटनिवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाच्या हाताळणीवर टीका केली आणि म्हटले की, केवळ मतांचीच चोरी झाली नाही, तर मतदान केंद्रे देखील ताब्यात घेण्यात आली होती. राज्य सरकारच्या निर्देशांनुसार काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
दिल्ली पोलिसांच्या मते, विरोधी पक्षाच्या खासदारांनी निषेध मोर्चासाठी अधिकृत परवानगी घेतली नव्हती.