तृणमूल काँग्रेसचे आमदार सुदीप रॉय बर्मन यांनी त्रिपुरा विधानसभा अध्यक्षांसमोरील राजदंड पळवून नेल्यामुळे एकच खळबळ उडाली. विधानसभेचे कामकाज चालू असतानाच अचानक वनमंत्री नरेश जमातिया यांच्या चौकशीची मागणी करत सुदीपरॉय बर्मन हे विधानसभा अध्यक्ष रमेंद्र देवनाथ यांच्यासमोर आले आणि त्यांच्यासमोर ठेवण्यात आलेला राजदंड घेऊन पळण्यास सुरूवात केली. सभागृहातील माशर्लंनी त्यांचा पाठलाग करून राजदंड मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु बर्मन यांनी तोपर्यंत राजदंड विधानसभेबाहेर नेला होता.

त्रिपुराचे वन व ग्रामीण विकास मंत्री नरेश जमातिया यांच्यावर सेक्सस्कँडलमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सुदीप बर्मन चर्चेची मागणी करत होते. परंतु विधानसभाध्यक्ष देवनाथ यांनी याला नकार दिला. याचाच विरोध करत बर्मन यांनी राजदंड पळवला. त्रिपुरा विधानसभेत अशा प्रकारची घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही पाच वेळा अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत.
त्रिपुरा विधानसभेत सोमवारी शून्यकाळादरम्यान हा गोंधळ झाला. बर्मन हे जमातिया यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी करत होते. जमातिया आणि आगरतळा महानगरपालिकेचे नगरसेवक मृतमन सेन यांच्यावर ७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप होता. सेन यांना त्रिपुरा पोलिसांनी अटकही केली होती. परंतु नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती.