चीन व व्हिएतनाम यांच्यातील दक्षिण चीन सागराच्या मुद्दय़ावरून तणाव आणखी वाढला असून चीनने व्हिएतनाम बरोबरचे द्विपक्षीय कायऱ्क्रम रद्द केले आहेत.
चीनच्या तीन हजार कामगारांना व्हिएतनाममधून माघारी आणण्यात आले. चीनच्या मेटॅलर्जिकल कार्पोरेशनच्या सदस्यांचे शिचुआन प्रांतात चेंगडू शुआनग्लिअू विमानतळावर रविवारी आगमन झाले. व्हिएतनाममधील चिनी दूतावासाच्या मदतीने ते चीनमध्ये परतले असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. चीनने व्हिएतनाम बरोबरचे द्विपक्षीय कामकाज थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. चीनच्या नागरिकांविरोधात व्हिएतनाममध्ये हिंसाचार करण्यात आल्याने हे पाऊल उचलण्यात आले, असे चीनचे परराष्ट्र प्रवक्ते होंग लेई यांनी सांगितले.
व्हिएतनाममध्ये दोन चिनी नागरिक मारले गेले असून इतर १०० जण जखमी झाले आहे. हाँग यांनी सांगितले, की व्हिएतनाममधील चिनी पर्यटकांसाठी असलेली सुरक्षा स्तराबाबतच्या सूचनेत चीनने बदल केला आहे. व्हिएतनाममध्ये जाऊ नका, असा सल्ला त्यात देण्यात आला आहे.
व्हिएतनाममध्ये परदेशी कंपन्यांच्या विरोधात १३ मे पासून दंगली सुरू आहेत, त्यात चिनी लोकांचे खूप नुकसान झाले असून घातपाताचे वातावरण असल्याने द्विपक्षीय संबंधात अडथळे येत आहेत. चीनविरोधी शक्तींशी साटेलोटे करून व्हिएतनाम दंगली भडकवित आहे, असा चीनचा आरोप आहे. अनधिकृत वृत्तानुसार दंगलीत २१ चिनी लोक मारले गेले असून चीनने वादग्रस्त दक्षिण चीन समुद्रात कुमक वाढवल्याने व्हिएतनाममध्ये त्याचे पडसाद उमटले. दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याचे व्हिएतनामने मान्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vietnam clamps down on anti china protests
First published on: 19-05-2014 at 06:09 IST