तमिळनाडूच्या करुर येथे ‘तमिलगा वेत्री कळ्ळगम’ (टीव्हीके) पक्षाचे प्रमुख तथा अभिनेता विजय याच्या सभेला प्रचंड गर्दी होऊन झालेल्या चेंगराचेंगरीत ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०० हून अधिक लोक जखमी झाले. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होते आहे. दरम्यान आता थलपती विजयने लोकांच्या रडण्याकडे आणि त्यांच्या धक्काबुक्कीकडे दुर्लक्ष केलं असा दावा काही प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.
चेंगराचेंगरी का झाली?
चेंगराचेंगरी का झाली त्याची विविध कारणं समोर येत आहेत. पोलीस या सगळ्या प्रकाराची चौकशी करत आहेत. सध्या विशिष्ट एका कारणामुळे चेंगराचेंगरी झाली याच्या निष्कर्षापर्यंत पोहचणं कठीण होईल असं पोलिसांनी म्हटलं आहे. दरम्यान लोक एकदम जोशात होते, विजयचं म्हणणं ऐकण्यासाठी गर्दीचे कान एकवटले होते. अचानक काहीतरी घडलं आणि जोशात सुरु असलेली रॅली अचानक चेंगराचेंगरी सुरु झाली. त्यानंतर जोशाचं रुपांतर वेदना, किंकाळ्यांमध्ये झालं. गर्दीला नियंत्रित करण्यात पोलीस अयशस्वी ठरले त्यामुळे एकच हलकल्लोळ माजला. दरम्यान आता अनेक प्रत्यक्षदर्शी वेगळाच आरोप करत आहेत. अभिनेता विजयने लोकांच्या रडण्याकडे लक्ष दिलं नाही असा दावा काही प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.
थलपती विजयवर लोकांचा काय आरोप?
थलपती विजय संध्याकाळी ७ च्या दरम्यान मैदानात आला. त्याने पाहिलं की प्रचंड गर्दी झाली आहे. लोक झाडावर, छपरावर चढले होते. तसंच विजय आला त्याने पाहिलं की धक्काबुक्की होते आहे पण विजयने त्याकडे दुर्लक्ष केलं. लोक विजय आला तेव्हा लोक धक्काबुक्की करुन एकमेकांच्या दिशेने स्लीपर्स फेकत होते. काही लोकांना चक्करही आली होती. मात्र या सगळ्यापेक्षा विजयला त्याची रॅली महत्त्वाची होती असं या प्रत्यक्षदर्शीने एनडीटीव्हीला सांगितलं.
आणखी एका प्रत्यक्षदर्शीने काय सांगितलं?
आणखी एका प्रत्यक्षदर्शीने हा दावा केला आहे की विजय आला आणि त्याने लोकांना हात दाखवणं अपेक्षित होतं. तसं केलं असतं लोक त्याच्या मागे गेले नसते. त्यावेळी अनेक लोक रडत होते पण विजयने त्यांच्याकडे पाहिलंही नाही. इतकी मोठी घटना घडून जेव्हा १२ तास उलटले तेव्हा विजयने आदरांजली वाहिली आणि संवेदना व्यक्त केल्या. तसंच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २० लाखांची मदतही जाहीर केली. तर जखमींना प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. हे सगळं असलं तरीही त्याने दुर्लक्ष केलं असा आरोप काही प्रत्यक्षदर्शी करत आहेत. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.