Vijay Rupani dies in Air India Plane Crash : अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेने देश हादरला आहे. या विमान अपघातात आतापर्यंत २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबादवरून लंडनला निघालेल्या या विमानाने गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील प्रवास करत होते. या विमान दुर्घटनेत त्यांचाही मृत्यू झाला आहे. विजय रुपाणी हे लंडनला त्यांची पत्नी व मुलीला भेटण्यासाठी जात होते. रुपाणी यांच्या निधनाने गुजरात भाजपाचं मोठं नुकसान झालं आहे. भाजपाचा गुजरातमधील एक आश्वासक चेहरा या दुर्घटनेने हिरावून घेतला आहे.
दरम्यान, विजय रुपाणी यांच्या निधनाच्या तारखेशी संबंधित एक आगळावेगळा संयोग समोर आला आहे. गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारचा नंबर १२०६ (GJ 03 HK 1206) असा होता. त्यांच्या स्कूटरचा नंबर देखील १२०६ च (GJ 03 DE 1206) होता. त्यांचे मित्र व निकटवर्तीयांनी सांगितलं की विजय रुपाणी १२०६ हा त्यांचा लकी क्रमांक (शुभ अंक) आहे असं मानत होते. आयुष्यभर हीच भावना त्यांच्या मनात होती मात्र, त्यांचा हाच लकी क्रमांक त्यांच्यासाठी अनलकी ठरला आहे. कारण १२-०६ (१२ जून २०२५) या तारखेला त्यांचा मृत्यू झाला आहे. एअर इंडियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या नावांची यादी (Boarded Passenger) समोर आली आहे. या यादीत १२ व्या नंबरवर विजय रमणिकलाल रुपाणी असं नाव होतं. २ डी हा त्यांचा सीट नंबर होता.
या विमान दुर्घटनेची बातमी समोर आल्यानंतर रुपाणी कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. तसेच गुजरात भाजपाने रुपाणी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
विमान दुर्घटनेत २६५ जणांचा मृत्यू
एअर इंडियाचं अहमदाबाद-लंडन विमान गुरुवारी (१२ जून) दुपारी सरदार वल्लभभाई पटेल विमानतळानजिक दुर्घटनाग्रस्त झालं आहे. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळावरून २६५ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या विमानात १२ क्रू सदस्यांसह एकूण २४२ प्रवासी होते. त्यांच्यापैकी केवळ एक प्रवासी बचावला आहे. तर, उर्वरित २४१ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच हे विमान मेघानी नगरमधील नागरी वस्तीत (डॉक्टरांच्या वसतीगृहाच्या इमारतीवर) कोसळल्यामुळे वस्तीतही मोठी जीवित व वित्तहानी झाली आहे. विमान कोसळल्यामुळे मेघानी नगरमधील २४ रहिवासी मृत्यूमुखी पडले आहेत.