पीटीआय, बंगळुरू

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विनय कुलकर्णी आणि जी. जनार्दन रेड्डी हेही आपले नशीब आजमावत आहेत. मात्र, या उमेदवारांना त्यांच्या जिल्ह्यात प्रवेशबंदी आहे.काँग्रेसचे उमेदवार कुलकर्णी हे धारवाड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मात्र त्यांना जिल्ह्यात प्रवेशबंदी आहे. तर बेल्लारी जिल्ह्यात प्रवेशावर न्यायालयाने घातलेल्या बंदीमुळे रेड्डी यांनी आपल्या पत्नीला बेल्लारी शहरातून उभे केले असून, स्वत: कोप्पल जिल्ह्यातील गंगावतीतून लढत आहेत.

कुलकर्णी यांच्या वतीने त्यांच्या पत्नी शिवलीला यांनी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांनी पत्रकारांना सांगितले, की कुलकर्णी इथे येतील, या ठाम विश्वासाने आमचे समर्थक साथ देत आहेत. मतदार सध्या मला त्यांच्या ठिकाणी मानतील. कुलकर्णी यांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी चित्रफिती व दूरध्वनी हेच साधन आहे. कुलकर्णीनी एका चित्रफितीतील संदेशात आपल्या समर्थकांना सांगितले, की आपल्या मतदारसंघांसाठी मी स्वत:ला समर्पित केले आहे. मला समर्थन देणारे तुम्ही सर्वच माझी ताकद आहात. माजी मंत्री कुलकर्णी यांना जून २०१६ मध्ये भाजप नेते आणि जिल्हा पंचायत सदस्य योगेशगौडा गौडर यांच्या हत्येप्रकरणी नोव्हेंबर २०२० मध्ये अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. न्यायालयाच्या परवानगीशिवाय त्यांना धारवाडमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, या अटीवर सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. धारवाडला कर्नाटकची सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखले जाते.

‘बेल्लारीचे रेड्डी ब्रदर्स’ म्हणून ओळख असलेले माजी खाण उद्योगपती जनार्दन रेड्डी यांचे प्रकरण कुलकर्णीपेक्षा फारसे वेगळे नाही. भाजपचे माजी मंत्री असलेल्या रेड्डी यांना बेकायदा खाण प्रकरणात कर्नाटकातील बेल्लारी आणि आंध्र प्रदेशातील अनंतपूर आणि वायएसआर कडप्पा जिल्ह्यात सर्वोच्च न्यायालयाने प्रवेशबंदी केली आहे. रेड्डी यांनी आता भाजपशी संबंध तोडून आपल्या ‘कल्याण राज्य प्रगती पक्षा’ची (केआरपीपी) स्थापना केली आहे. मात्र, त्यांचे बंधू जी. करुणाकर रेड्डी व जी. सोमशेखर रेड्डी हे अद्याप भाजपमध्येच असून, अनुक्रमे बेल्लारी (शहर) आणि हरपनपल्ली येथून निवडणूक लढवत आहेत. जनार्दन रेड्डी यांनी कोप्पल जिल्ह्यातील गंगावती मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपली पत्नी लक्ष्मी अरुणा यांना बेल्लारी (शहर) मतदारसंघातून आपला भाऊ सोमशेखर रेड्डी यांच्या विरोधात उभे केले आहे.

कुमारस्वामी रुग्णालयात; विश्रांतीचा सल्ला

बंगळुरू : धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना थकवा व अशक्तपणा जाणवत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती स्थिर असून ते बरे होत असल्याची माहिती संबंधित रुग्णालयाने निवेदनाद्वारे रविवारी दिली.
कुमारस्वामी यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार ६३ वर्षीय कुमारस्वामी यांना ताप आला असून, डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुमारस्वामी सातत्याने राज्यात प्रचार दौरे करत आहेत. कुमारस्वामी यांच्यावर यापूर्वी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.रुग्णालयाच्या निवेदनात नमूद केले आहे, की कुमारस्वामी यांना २२ एप्रिल रोजी संध्याकाळी बंगळुरूच्या मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अडीचशे कोंटीच्या वस्तू व रोकड जप्त

बंगळूरु : कर्नाटक विधासभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून (२९ मार्च) आतापर्यंत २५० कोटी रुपयांच्या वस्तू, रोकड तसेच मद्य जप्त करण्यात आले आहे. यात वाटपासाठी आणलेल्या वस्तूंची किंमत २० कोटी, रोकड ८२ कोटी, मद्य ५७ कोटी, चांदी ७८ कोटी तसेच १७ कोटींचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी १ हजार ९३० एफआयआरची नोंद करण्यात आली आहे. कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान होणार आहे.