पीटीआय, कोलकाता : हुगळी नदीकिनारी ‘गार्डन रीच शिपबिल्डर्स इंजिनीयर्स लिमिटेड’ (जीआरएसई) केंद्रात भारतीय नौदलाच्या ‘प्रोजेक्ट १७ अल्फा’अंतर्गत निर्मित ‘विंध्यगिरी’ या सहाव्या युद्धनौकेचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गुरुवारी जलावतरण करण्यात आले. मुर्मू यांनी ही युद्धनौका ‘आत्मनिर्भर भारता’चे प्रतीक असल्याचे नमूद केले.

राष्ट्रपती म्हणाल्या की, ‘विंध्यगिरी’च्या जलावतरण सोहळय़ाला उपस्थितीत राहिल्यामुळे मला आनंद वाटतो. हा कार्यक्रम भारताच्या सागरी क्षमता वृध्दिंगत करण्यासाठी टाकलेल्या पावलाचे प्रतीक आहे. जगातील तिसरी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने आपले प्रयत्न सुरू आहेत. सागरी सुरक्षेसाठी भारतीय नौदलाच्या महत्त्वपूर्ण कामगिरीचाही राष्ट्रपतींनी विशेष उल्लेख केला. यावेळी पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

योजनेनुसार एकूण सात युद्धनौकांची निर्मिती करण्यात येणार आहे. यापैकी ‘विंध्यगिरी’ ही सहावी आहे. या अगोदर पाच युद्धनौकांचे जलावतरण २०१९ ते २०२२ दरम्यान करण्यात आले.  कोलकाता येथील जीआरएसई या युद्धनौका निर्मात्याने ‘प्रोजेक्ट १७ अल्फा’ या योजनेअंतर्गत तयार केलेली ही तिसरी आणि अखेरची युद्धनौका आहे.