पीटीआय, नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकशाहीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत अशी टीका भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केली. ज्यांना लोकशाहीवर विश्वास नाही, त्यांना लोकशाहीत स्थान नाही आणि राहुल यांना लोकशाही मार्गाने पूर्णपणे घरी बसवले पाहिजे, असे ते म्हणाले. भारतीय जनता युवा मोर्चाच्या ‘राष्ट्रीय युवा संसद’ या कार्यक्रमाचे आभासी पद्धतीने उद्घाटन करताना नड्डा यांनी राहुल यांना लक्ष्य केले.

राहुल  यांनी अमेरिका आणि युरोपीय महासंघाला भारताविरोधात भडकावले या आरोपाचा पुनरुच्चार करतानाच नड्डा यांनी काँग्रेस ‘मानसिकदृष्टय़ा दिवाळखोर’ झाली असल्याची टीकाही केली.

‘अदानी प्रकरणावरून लक्ष वळवण्यासाठी..’

ब्रिटनमध्ये केलेल्या भाषणाबद्दल भाजपच्या नेत्यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी राहुल यांनी संसदेत बोलण्याची परवानगी मागितली आहे याकडे काँग्रेस पक्षातर्फे लक्ष वेधण्यात आले. अदानी प्रकरणावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजप नेते राहुल यांच्या वक्तव्याचा विपर्यास करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला.