विधानसभा निवडणुकीनंतर हिंसाचाराचा सामना करणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा तीच परिस्थिती उद्भवताना दिसत आहे. सोमवारी, तृणमूल काँग्रेसच्या पंचायत नेत्याच्या हत्येनंतर उसळलेल्या हिंसाचारात १० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या लोकांच्या घरांना आग लावण्यात आली, त्यात ते जिवंत जळले आणि मरण पावले. याशिवाय मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीरभूम जिल्ह्यातील बारशाल ग्रामपंचायतीचे उपप्रमुख भादू शेख यांची सोमवारी हत्या करण्यात आली. त्यानंतरच रात्री ही जाळपोळीची घटना घडली, ज्यात १० जणांना जिवंत जाळण्यात आले. भादू शेख हा बोगतुई गावचा रहिवासी होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्थानिकांचे म्हणणे आहे की तृणमूलच्या एका गटाच्या सदस्यांनी जाळपोळ केली. मात्र, तृणमूल काँग्रेसने हे आरोप फेटाळून लावले आहेत. बीरभूम जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसचे अध्यक्ष अनुब्रत मंडल यांनी मंगळवारी दुपारी दावा केला की हिंसाचाराच्या वेळी आग लागली नव्हती. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे त्यांनी सांगितले आणि त्यामुळे घरांना आग लागली. तृणमूल कार्यकर्त्यांची हत्या झाल्याचे नाकारत मंडल म्हणाले की, “शॉर्ट सर्किटमुळे लोकांच्या घरांना आग लागली आणि त्यामुळेच मृत्यू झाला. सोमवारी रात्री कोणताही हिंसाचार झाला नाही.”

अग्निशमन दलाच्या एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, त्यांना आगीत किमान १० घरे उद्ध्वस्त झाल्याचे आढळले आहे. “आम्हाला काही स्थानिक लोकांनी आग विझवण्यापासून रोखले,” असे कर्मचाऱ्याने म्हटले. आतापर्यंत एका घरातून सात मृतदेह मिळाले आहेत. ते इतके गंभीररित्या जळाले आहेत की ते पुरुष, महिला की अल्पवयीन आहेत हे देखील समजू शकत नाही. सध्या घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात असून परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. ममता बॅनर्जी सरकारमधील मंत्री फिरहाद हकीम आणि रामपूर हाटचे आमदार आशिष बॅनर्जी घटनास्थळी पोहोचले आहेत.

तृणमूल काँग्रेसचे पंचायत नेते भादू शेख यांच्यावर चार मोटरसायकलस्वारांनी हल्ला केला होता. हल्लेखोरांनी तोंड झाकले होते, त्यामुळे त्यांची ओळख पटू शकली नाही. गोळ्या झाडल्यानंतर लगेचच शेखला रामपूर हाट येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. तृणमूलच्याच दोन गटांमध्ये सुरू असलेल्या वादातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात घरांची तोडफोड करून जाळपोळ करण्यात आली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Violence again in bengal houses set ablaze after killing of tmc leader 10 burnt alive abn
First published on: 22-03-2022 at 13:06 IST