दुबई : इराणमध्ये पोलीस कोठडीत तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर उसळलेल्या दंगलीत किमान ९ जणांचा बळी गेला. राजधानी तेहरानसह देशाच्या अनेक भागांत अद्याप दंगली होत असून जमावाला नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागत आहे.

गेल्या शुक्रवारी माशा अमिनी या तरुणीचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला होता. पोलिसांनी केलेल्या मारहाणीत तिचा मृत्यू झाल्याचे वृत्त इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून देशभरात वाऱ्यासारखे पसरले. या अत्याचाराविरोधात सगळीकडे निदर्शने सुरू झाली. इराणमध्ये सक्तीचे असलेले डोक्यावरचे स्कार्फ महिलांनी भिरकावून दिले.

‘हुकूमशहाचा नायनाट होवो’ अशी घोषणा देत लोकांनी मोर्चे काढले. तेहरान विद्यापीठातही या आंदोलनाचे लोण पसरले. याआधीही अन्य मुद्दय़ांवर आंदोलने झाली असली तरी या आंदोलनाला भावनिक जोड असल्यामुळे ते अधिक उग्र असल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. इराणच्या सरकारी वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार किमान १३ शहरांमध्ये निदर्शने सुरू आहेत. आंदोलन चिरडण्यासाठी पोलीस अश्रुधूर, लाठीमार, बंदुकीच्या रबरी गोळय़ांचा मारा करत असल्याची चित्रफीत लंडनच्या अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थेने जारी केली. आंदोलने होत असलेल्या भागांमधील इंटरनेट सेवा सरकारने बंद केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय घडले? माशा अमिनी २२ वर्षीय तरुणीला तेहरानच्या ‘मोरल पोलिसां’नी अटक केली. हिजाब व्यवस्थित घातला नसल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला. कोठडीत असतानाच तिचा मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला. मात्र माशाला हृदयरोग नसल्याचे तिच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केले. पोलिसांनी केलेल्या मारहाणीत तिचा मृत्यू झाल्याचा आरोप होत असून त्याविरोधात इराणी जनता पेटून उठली आहे.