इम्फाळ :मणिपूरच्या इम्फाळ पश्चिम जिल्ह्यामध्ये अज्ञात बंदूकधाऱ्याने गुरुवारी एका शाळेबाहेर केलेल्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला तर कांगपोकपी येथे अधूनमधून गोळीबाराचे आवाज ऐकू आले अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. क्वाकीथल मायाइ कोइबी येथे ही घटना घडली.

मणिपूरमध्ये दोन महिन्यांच्या हिंसाचारानंतर बुधवारपासून पहिली ते आठवी इयत्तेचे वर्ग सुरू झाले. गोळीबारात मरण पावलेली महिला शाळेजवळ काही कामासाठी गेली होती, पण ती शैक्षणिक संस्थेशी संबंधित नव्हती असे सांगण्यात आले. 

दुसरीकडे कांगपोकपी जिल्ह्यामध्ये बुधवारी दुपारी स्वयंचलित शस्त्रे जवळ बाळगलेल्या लोकांनी गावकऱ्यांवर हल्ला चढवला होता. मात्र तेथील सुरक्षा दलांनी संघर्ष टाळला. त्यानंतर गुरुवारी पहाटे तिथे अधूनमधून गोळीबाराचे आवाज ऐकू आले.

इंटरनेटबंदीविरोधातील याचिका फेटाळली

नवी दिल्ली : मणिपूरमध्ये वारंवार केल्या जाणाऱ्या इंटरनेटबंदीविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. मणिपूरचे दोन रहिवासी चोंगथाम व्हिक्टर सिंह आणि मायेंगबम जेम्स या दोघांनी दाखल केलेली याचिका सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. पी एस नरसिंह आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने फेटाळली. मणिपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर आधीच या मुद्दय़ावर खटला सुरू आहे आणि यासंदर्भात एक तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली असून राज्यात इंटरनेट सेवा पुनस्र्थापित करता येईल का याची तपासणी केल्याचे निर्देश देण्यात आले आहेत असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले.

संसदीय समितीच्या बैठकीतून विरोधक बाहेर नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संसदीय स्थायी समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत विरोधी पक्षांनी मणिपूरच्या स्थितीवर चर्चा करण्याचा आग्रह धरला. मात्र समितीच्या प्रमुखांनी ही मागणी मान्य न केल्यामुळे नाराज सदस्य बैठकीतून बाहेर पडले. संयुक्त पत्र लिहून मणिपूरच्या स्थितीवर तातडीने चर्चा करण्याची मागणी करणाऱ्या संयुक्त पत्रावर तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन, काँग्रेसचे दिग्विजय सिंह आणि प्रदीप भट्टाचार्य यांनी सह्या केल्या.