गोळीबारात तीन जखमी * भारताचा नव्या राज्यघटनेचे ‘स्वागत करण्यास’ नकार
नेपाळमध्ये नवी राज्यघटना लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध देशात हिंसाचार उसळला आहे. भारतीय सीमेलगत असलेल्या एका शहरात या घटनेच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या मधेशी कार्यकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन जण जखमी झाले. दरम्यान, नेपाळी पंतप्रधानांनी आंदोलक गटांना चर्चेसाठी बोलावले आहे.
राष्ट्रपती रामबरन यादव यांनी नेपाळचे धर्मनिरपेक्ष व लोकशाही प्रजासत्ताकात संक्रमण घडवणाऱ्या नव्या घटनेची घोषणा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ‘जॉइंट मधेशी फ्रंट’च्या कार्यकर्त्यांनी अनेक भागांत निदर्शने केली. काठमांडूनंतरच्या देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या व उपमहानगरपालिका असलेल्या बिराटनगर शहरात आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात किमान तिघे जखमी झाले. त्यांच्यावर एका स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. सिराहा जिल्ह्य़ात आंदोलकांनी घटनेच्या प्रतींची होळी केली.
नेपाळच्या दक्षिण व पश्चिम भागात मधेशी आघाडी आणि थारुवान संघर्ष समिती यांच्या गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे देशातील जनजीवनावर विपरीत परिणाम झाला आहे. देशाचे सात संघराज्यांमध्ये विभाजन करण्यास हे आंदोलक विरोध करीत आहेत.
दरम्यान, नवी घटना लागू होण्याचा ऐतिहासिक प्रसंग साजरा करण्यासाठी नेपाळी काँग्रेस, सीपीएन-यूएमएल आणि यूसीपीएन-माओवादी या तीन मोठय़ा राजकीय पक्षांनी सोमवारी तुंडिखेलच्या खुल्या मैदानात संयुक्त जाहीर सभा घेतली. पंतप्रधान व नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष सुशील कोईराला, सीपीएन-यूएमएलचे अध्यक्ष के.पी. शर्मा ओली आणि यूसीपीएन-माओवादीचे अध्यक्ष पुष्पकमल प्रचंड या नेत्यांनी हजारोंच्या संख्येत जमलेल्या लोकांना संबोधित केले.
आपले प्रश्न सोडवून घेण्यासाठी सर्वानी वाटाघाटीसाठी यावे असे आवाहन कोईराला यांनी या वेळी केले, तर मधेशींसह इतरांच्या नागरिकत्व, लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व यांसारख्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या असल्याचा दावा माओवादी नेते प्रचंड यांनी केला आणि या पक्षांनी चर्चेच्या टेबलावर यावे असे आवाहन केले.
भारतीय राजदूतांना पाचारण
नेपाळमध्ये सुरूच असलेला हिंसाचार आणि भारताच्या सबुरीच्या सल्ल्यानंतरही नवी घटना स्वीकारण्याच्या त्या देशाच्या निर्णयाचा परिणाम यामुळे चिंतित झालेल्या भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने नेपाळमधील भारताचे राजदूत
रणजित राय यांना दिल्लीला बोलावून घेतले. ते एक दिवस विचारविनिमय करण्यासाठी येथे आले असून
उद्या दुपारी परत जातील, असे मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
भारतीय सीमेवरील नेपाळी जिल्ह्य़ांमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराबाबत आमची चिंता आम्ही नेपाळ सरकारला कळवली असल्याचे सांगून, भारत सरकारने नेपाळच्या नव्या घटनेचे स्वागत करण्यास नकार दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Violence in nepal over new constitution
First published on: 22-09-2015 at 03:34 IST