“मंत्रिपद स्वीकारल्यापासून माझे आर्थिक उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले”, असे खळबळजनक विधान केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांनी रविवारी एका जाहीर कार्यक्रमात केले. इतकेच नव्हे, तर मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची इच्छादेखील त्यांनी यावेळी बोलून दाखवली. सुरेश गोपी यांनी केलेले विधान सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री नाराज आहेत का, असा कयास अनेकांकडून बांधला जात आहे. दरम्यान, कोण आहेत सुरेश गोपी? त्यांनी अचानक राजीनामा देण्याची इच्छा का व्यक्त केली? काय आहे त्यामागचे कारण? याबाबत सविस्तर जाणून घेऊ…
कोण आहेत सुरेश गोपी?
सुरेश गोपी हे केरळमधील भाजपाचे एकमेव खासदार आहेत. ९ जून २०२४ रोजी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली होती. दुसऱ्याच दिवशी सुरेश गोपी यांच्याकडे पर्यटन व पेट्रोलियम मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर आठवडाभरातच ते आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या. सुरेश गोपी हे लवकरच मंत्रिपद सोडणार असल्याचे वृत्त त्यावेळी एका मल्याळम वृत्तवाहिनीने दिले होते.
अभिनय हा सुरेश गोपी यांचा छंद असून त्यांचे आधीच काही चित्रपट प्रकल्प पाइपलाइनमध्ये असल्याचा दावाही या वृत्तातून करण्यात आला होता. मात्र, गोपी यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करीत हा दावा फेटाळून लावला होता. “मी मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे वृत्त चुकीचे आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये राहून मला केरळमध्ये विकास करायचा आहे. मी राजकारण सोडून कुठेही जाणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले होते.

सुरेश गोपी यांची राजीनाम्याची तयारी
मंत्री सुरेश गोपी यांनी रविवारी केरळमधील कन्नूर येथे भाजपाच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी खळबळजनक विधान केले. “मंत्रिपद स्वीकारल्यापासून माझे आर्थिक उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले आहे. चित्रपटांचे काम सोडून मंत्री होण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. मला पुन्हा अभिनय सुरू करायचा असून, पैसे कमावणे गरजेचे आहे. माझे आर्थिक उत्पन्न आता पूर्णपणे थांबले आहे,” असे गोपी यांनी म्हटले. मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे. अभियन क्षेत्रातील आपले करिअर पुढे चालू ठेवण्याचा मानस असल्याचे गोपी यांनी सांगितले आहे.
मंत्रिपदासाठी कधीच प्रार्थना केली नाही : सुरेश गोपी
“मी कधीही मंत्री होण्यासाठी प्रार्थना केलेली नाही. निवडणुकीच्या एक दिवस आधीच मी पत्रकारांना सांगितले होते की, मला मंत्री व्हायचे नाही, मला माझा चित्रपट व्यवसाय सुरू ठेवायचा आहे. मी ऑक्टोबर २००८ मध्ये पक्षात प्रवेश केला… लोकांनी निवडून दिलेला मी पहिला खासदार ठरलो. आणि पक्षाने मला मंत्रिपदाची जबाबदारी द्यायचे ठरवले”, असे त्यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

“मंत्रिपदासाठी मी कधीच प्रार्थना केली नाही. मंत्री होण्यात मला कोणतीही रुची नसल्याचे निवडणुकीच्या एक दिवस आधीच मी पत्रकारांना सांगितले होते. मला माझा चित्रपट व्यवसाय सुरू ठेवायचा आहे. मी ऑक्टोबर २००८ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. गेल्या वर्षीच्या निवडणुकीत केरळमध्ये विजय मिळवणारा मी पक्षाचा एकमेव खासदार ठरलो. त्यावेळी पक्षश्रेष्ठींनी स्वत:हून माझ्याकडे मंत्रिपदाची जबाबदारी दिली,” असे गोपी यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले.
सदानंद मास्टर यांच्या नावाची शिफारस
भाजपातील आपण सर्वांत तरुण सदस्य असल्याचे नमूद करीत गोपी यांनी पक्षात नव्याने निवडून आलेले राज्यसभा खासदार सदानंदन मास्टर यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्याची शिफारस केली. कन्नूर जिल्ह्यातील या ज्येष्ठ नेत्याची राज्यसभेतील निवड हा उत्तर केरळच्या राजकारणातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे गोपी म्हणाले. “मी मनापासून सांगतो की, माझ्या जागी सदानंदन मास्टर यांना केंद्रीय मंत्रिपद दिले पाहिजे. हा निर्णय केरळच्या राजकीय इतिहासात एक नवा अध्याय ठरेल, असा माझा विश्वास आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

सदानंदन मास्टर हे कन्नूर जिल्ह्यातील भाजपाचे ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत. ते राजकीय हिंसेचे बळी ठरलेले कार्यकर्ते आहेत. १९९४ मध्ये सीपीआय (एम) कार्यकर्त्यांनी केलेल्या कथित हल्ल्यात त्यांना आपले दोन्ही पाय गमावावे लागले होते. तरीही त्यांनी राजकारणातील आपला संघर्ष सुरूच ठेवला आहे. दरम्यान, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुरेश गोपी यांनी त्रिशूर मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यानंतर केंद्रात मंत्रिपद स्वीकारण्यास त्यांनी नकार दिल्याच्या बातम्या समोर आल्या. मात्र, पक्षश्रेष्ठींच्या आग्रहामुळे गोपी यांनी मंत्रिमंडळ विस्ताराआधी दिल्ली गाठली आणि केंद्रीय पेट्रोलियम व पर्यटन राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

काँग्रेसमधून भाजपात केला होता प्रवेश
सुरेश गोपी यांनी आपल्या कारकिर्दीत २५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी काँग्रेसमधून राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. काँग्रेसचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले के. करुणाकरन यांचा हात धरून त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. मात्र, करुणाकरन यांनी सक्रिय राजकारण सोडल्यानंतर गोपी यांचे पक्षाबरोबरचे संबंध ताणले गेले. परिणामी काँग्रेसची साथ सोडून त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने त्यांना त्रिशूर मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत गोपी यांनी ३७.८% मतांच्या वाट्यासह ७४ हजारांहून अधिक मताधिक्याने काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला होता.