नवी दिल्ली : देशातील निवडणुकांच्या निकालांमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजपच्या संगनमताने फेरफार केल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी नवी दिल्लीत केला. मतदान आणि निकालांतील कथित गैरप्रकारांचे पुरावे मांडत राहुल यांनी हा ‘मोठा फौजदारी घोटाळा’ असल्याचे म्हटले. या आरोपांनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने लगेचच राहुल यांना शपथपत्राद्वारे हे पुरावे देण्याची मागणी केली आहे, तर ‘ही राहुल गांधी यांची लबाडी असून लोकशाहीविरोधातील कारस्थान’ असल्याची टीका भाजपने केली आहे.

दिल्लीतील काँग्रेसच्या इंदिरा भवन मुख्यालयातील सुमारे सव्वा तासाच्या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी केंद्रीय निवडणूक आयोगाने २०२४च्या लोकसभा निवडणुकीत मतांची ‘चोरी’ कशी केली, याचे पहिल्यांदाच पुरावे सादर केले. राहुल यांनी या संदर्भात आजवर केलेले आरोप निवडणूक आयोगाने ‘पुरावे नसलेले’ आणि ‘निराधार’ म्हणून फेटाळले होते. मात्र या वेळी ‘आम्ही ठोस पुरावे दिले आहेत. मतचोरीचे पुरावे आयोगाच्या माहिती-विदामधूनच जमा केलेले आहेत. आयोगानेही माहिती-विदा नाकारलेला नाही’ असा युक्तिवाद करत राहुल यांनी चेंडू आयोगाच्या कोर्टात टोलावला आहे.

राहुल गांधींनी पुरावे सादर केल्यानंतर लगेचच केंद्रीय निवडणूक आयोगाने, काँग्रेस नेत्याने संबंधित पुरावे सत्य असल्याचे शपथपूर्वक सादर करावेत, असा आदेश काढला. त्यावर, ‘मी राजकारणी आहे. मी लोकांसमोर बोललेला शब्द ही शपथच असते,’ असे प्रत्युत्तर राहुल यांनी दिले. उलट, आम्ही सादर केलेल्या मतचोरींच्या पुराव्यांमुळे मतदानावेळी घेतलेले सीसीटीव्ही फुटेज आणि डिजिटल स्वरूपातील मतदार यादी हे महत्त्वाचे पुरावे ठरतात. हे पुरावेच केंद्रीय निवडणूक आयोग नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

मतांची चोरी कोठेही झालेली नाही. मात्र राहुल गांधींच्या डोक्यातील चीप चोरीला गेली असून हार्डडिस्क करप्ट झाली आहे. सांविधानिक संस्थांना बदनाम करण्याचे काम राहुल गांधी करीत असून जनता त्यांना धडा शिकवेल.  देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

तुम्ही मतांची चोरी करून तेलंगण, कर्नाटकमध्ये निवडणुका जिंकल्या का? तुम्ही जिंकता तेव्हा निवडणूक आयोग चांगला, मतदान यंत्रे चांगली. पण तुम्ही हरला तर सर्वांना दोष देणार. यामुळेच जनतेने जागा दाखवली.  एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी लोकसभा निवडणूक जिंकते, पण पाच महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव होतो, हा निकाल अचंबित करणारा होता. या निकालामुळे निवडणूक घोटाळा होत असल्याचा संशय बळावला. महाराष्ट्रात पाच वर्षांमध्ये जितके मतदार वाढले नाहीत त्यापेक्षा जास्त मतदारवाढ अवघ्या पाच महिन्यांमध्ये झाल्याचे दिसले. – राहुल गांधी, काँग्रेस नेते

पाच अवैध मार्गांकडे बोट

आपल्या आरोपांना बळ देण्यासाठी राहुल गांधींनी कर्नाटकमधील बेंगळूरू-मध्य लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा दाखला दिला.

बेंगळूरू मध्य येथील सातपैकी सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसला मताधिक्य होते. मात्र महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात भाजपला १ लाख २५० इतके मताधिक्य मिळून पक्षाचा खासदार निवडून आला.

महादेवपुरात मतदारांचे खोटे पत्ते, एकाच पत्त्यावर अनेक मतदार, एकाच मतदाराकडून अनेक मतदान केंद्रांवर मतदान, छायाचित्रांमध्ये गोंधळ, नकली नवे मतदार असे प्रकार आढळल्याचा आरोप त्यांनी केला.

कुठल्या तरी एका विधानसभा मतदारसंघामध्ये मतांची चोरी केली तरी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजपला निकाल फिरवता येऊ शकतो, हे सिद्ध होते. हा पॅटर्न देशभर वापरता येऊ शकतो, असे ते म्हणाले.