नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी शनिवारी मतदान होत असून त्यामध्ये राजधानी दिल्लीतील सात जागांवर मतदार मतदानाचा हक्क बजावतील. २०१९ मध्ये तीनही पक्ष एकमेकांविरोधात लढले होते. या वेळी मात्र दिल्लीमध्ये काँग्रेस व आम आदमी पक्षाने (आप) आघाडी केल्यामुळे भाजपविरोधात थेट लढत होईल. भाजपच्या अर्धशतकी मतांचा टक्का मोडून काढण्यात विरोधकांना यश आले तर राष्ट्रीय स्तरावरही धक्कादायक निकालाची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे दिल्लीकर भाजप की, भाजपेतर पक्षांना कौल देतात याकडे लक्ष वेधले गेले आहे.

आप’च्या मतांवर निकाल अवलंबून?

२०१९ मध्ये भाजपला सरासरी ५६ टक्के मते मिळाली होती, २०१४ पेक्षा ही मते सुमारे ११ टक्क्यांनी अधिक होती. काँग्रेसला सुमारे २२ टक्के मते मिळाली होती. २०१४ च्या तुलनेत काँग्रेसच्या मतांमध्ये साडेसात टक्क्यांची भर पडली होती. ‘आप’ने मात्र १५ टक्के मते गमावली होती. २०१९ मध्ये ‘आप’ला १८ टक्के मते मिळाली. मतांतील हा फरक २०२४ मध्ये ‘आप’ने या वेळी भरून काढला तर ‘इंडिया’ आघाडीला भाजपवर मात करता येईल. त्यामुळे दिल्लीकर ‘आप’च्या पदरात किती मतांचा वाटा टाकतात यावर दिल्लीतील निकालाचे भविष्य अवलंबून असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. काँग्रेस व ‘आप’च्या आघाडीचा काँग्रेसला लाभ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, कमकुवत झालेल्या काँग्रेसचा ‘आप’ला किती फायदा होईल यावरही ‘आप’च्या मतांची टक्केवारी ठरेल.

उष्णतेच्या लाटेमुळे मतदानाकडे लक्ष

२०१९ मध्ये दिल्लीत सुमारे ६१ टक्के मतदान नोंदवले गेले होते. या वेळी दिल्लीसह उतरेमध्ये उष्णतेची लाट असून कमाल तापमान सरासरी ४४-४५ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे मतांच्या टक्केवारीकडे लक्ष असेल. उष्ण हवामानाचा फटका मतदानाच्या टक्केवारीवर होऊ नये याची दक्षता आयोगाकडून घेतली जात आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर उष्णतेच्या तडाख्यापासून मतदारांचा बचाव करण्यासाठी पुरेशा सुविधा पुरवण्यात आल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. रांगेत उभे राहिलेल्या मतदारांना उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी पुरेसा आडोसा, पिण्याचे पाणी, रॅम्प, स्वच्छतागृहे आणि इतर मूलभूत सुविधाही पुरवल्या जातील.

हेही वाचा >>>निवडणूक आयोगाला दिलासा! मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

रेवड्या विरुद्ध भ्रष्टाचार

मोफत वीज, पाणी आणि आरोग्यसुविधा या तीन रेवड्यांभोवती ‘आप’चा प्रचार केंद्रीभूत झाला होता. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्याविक्री घोटाळा प्रकरणात झालेली अटक हा मुद्दा आपने सहानुभूती निर्माण करण्यासाठी तर, भाजपने ‘आप’ सरकार घोटाळेबाज असल्याचा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरला. नवी दिल्लीसारख्या उच्चभ्रूंच्या मतदारसंघामध्ये देशाचा विकास व राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर भाजपने प्रचारात भर दिला होता. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व हा प्रचारातील कळीचा मुद्दा होता.

आप४, काँग्रेस३

भाजप स्वबळावर सातही जागा लढवत असून काँग्रेस चांदनी चौक, उत्तर-पूर्व व उत्तर-पश्चिम या तीन जागा लढवत आहे तर, पूर्व दिल्ली, दक्षिण दिल्ली, नवी दिल्ली व पश्चिम दिल्ली अशा चार मतदारसंघांत ‘आप’ लढत आहे.

भाजपने भाकरी फिरवली!

उत्तर-पूर्व मतदारसंघातील विद्यामान खासदार मनोज तिवारी वगळता अन्य सहाही मतदारसंघांतील उमेदवार भाजपने बदलले. नव्या उमेदवारांमुळे पन्नासहून अधिक मतांचा टक्का टिकवता येऊ शकेल असा दावा भाजपने केला आहे. २०१४ व २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने दिल्लीतील सातही जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला होता. या वेळीही भाजपला निर्भेळ यश मिळेल असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. विधानसभेच्या ७० जागांपैकी आपने ६२ जागा जिंकल्या तरीही लोकसभा निवडणुकीत ‘आप’ला काँग्रेसशी आघाडी करावी लागली. भाजपला स्वबळावर पराभूत करण्याची ‘आप’ वा काँग्रेसची ताकद नाही, असे मत दिल्ली भाजपचे पदाधिकारी अजय सेहरावत यांनी व्यक्त केले.