Waqf Board : १५ ऑगस्ट हा आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन. यंदाच्या वर्षी देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे पूर्ण होत आहेत. दरम्यान या दिवशी भारतातल्या एका राज्यात सगळ्या मदरशांवर आणि मशिदींवर तिरंगा ध्वज फडकणार आहे. छत्तीसगढ हे ते राज्य आहे. राज्य वक्फ बोर्डाने १५ ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी राज्यातील मशिदी, मदरसे आणि दर्गा या ठिकाणी ध्वजारोहण करण्याचे आदेश दिले आहेत.

छत्तीसगढ राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सलीम राज यांनी जारी केलं पत्रक

सलीम राज यांनी एक पत्रक जारी केलं आहे. त्यामध्ये त्यांनी हे म्हटलं आहे की छत्तीसगढ वक्फ बोर्डाच्या अखत्यारीत ज्या मशिदी, मदरसे आणि दर्गा येतात, त्या ठिकाणी तिरंगा फडकवा. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी देशभक्ती, बंधुभाव आणि एकतेची ओळख सगळ्या देशाला पुन्हा एकदा करुन द्या असंही या पत्रकात म्हणण्यात आलं आहे.

तिरंगा आपल्या देशाच्या स्वाभिमानाचं आणि सन्मानाचं प्रतीक

पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना डॉ. सलीम राज म्हणाले तिरंगा आपल्या सन्मानाचं आणि स्वाभिमानाचं प्रतीक आहे. काही मशिदींमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम होत नाही. पण मी हे सांगू इच्छितो की तिरंगा ध्वजाचा सन्मान हा कुठल्याही धर्मापेक्षा अधिक महत्त्वाचा आहे. तिरंगा फडकवण्यात कुणालाही काही आक्षेप असेल असं मला मुळीच वाटत नाही. त्यामुळे या प्रकारचा आदेश देणं आवश्यक होतं असंही डॉ. सलीम राज यांनी म्हटलं आहे. जनसत्ताने हे वृत्त दिलं आहे.

ज्यांचं देशावर प्रेम नाही त्यांनी…

डॉ. सलीम राज पुढे म्हणाले ध्वजारोहण कार्यक्रमात इमाम, मुतवल्ली किंवा मशीद समितीच्या सदस्यांनी गेलं पाहिजे. डॉ. सलीम राज पुढे म्हणाले तिरंगा आणि देशावर ज्याचं प्रेम नाही त्याला भारतमातेच्या या जमिनीवर राहण्याचा अधिकार नाही. जे कुणी तिरंगा फडकणवार नाहीत ते कट्टरपंथीय आहेत, देशावर प्रेम करणाऱ्या लोकांपेक्षा त्यांची विचारधारा वेगळी हेच ते दाखवून देतील.