हिमाचल प्रदेशातील चंबा या ठिकाणी मंगळवारी रामलीला सुरु होती. त्यावेळी एक धक्कादायक घटना घडली. चौगान मैदान या ठिकाणी रामलीला सुरु असताना दशरथाची भूमिका करणाऱ्या कलाकाराला अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांचा तिथेच मृत्यू झाला.
नेमकी घटना काय घडली?
चौगान मैदानावर रामलीला सुरु होती. त्यावेळी दशरथाची भूमिका करणारे ७० वर्षी कलाकार अमरेश महाजन यांना हृदयविकाराचा झटका आला. अमरेश उर्फ शिबू हे मुगला येथील राहणारे होते. मागील २३ वर्षांपासून ते रामलीला सादर असताना दशरथ आणि रावण अशा दोन भूमिका करायचे. यावर्षी रामलीला सादर करतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि तिथेच आपली कला दाखवत असतानाच त्यांचा श्वास थांबला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येकालाच हळहळ वाटते आहे.
मंगळवारी रात्री नेमका अटॅक कसा आला?
मंगळवारी रात्री साधारण ८.३० च्या सुमारास रामलीला कार्यक्रमात दशरथ दरबाराचा प्रसंग सुरु होता. त्यावेळी अमरेश महाजन हे राजा दशरथाच्या भूमिकेत होते आणि सिंहासनावर बसले होते. अचानक ते सिंहासनावरुन कोसळले आणि चक्कर येऊन खाली पडले. सुरुवातीला लोकांना वाटलं की हा त्यांच्या अभिनयाचा भाग आहे. पण अमरेश महाजन उठलेच नाहीत. त्यावेळी मंचावर असलेले कलाकार घाबरले. त्यांनी तातडीने अमरेश यांना जवळच्या रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासलं आणि मृत घोषित केलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.
प्रजा के लिये प्राण न्योछावर कर दूंगा हा ठरला शेवटचा संंवाद
अमरेश महाजन रामलीला सादर करत असताना दशरथाच्या भूमिकेत होते. मै प्रजा के लिये प्राण न्योछावर करु दुंगा हा संवाद त्यांनी म्हटला. त्यानंतर ते खाली कोसळले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हे दृश्य कॅमेरात कैद झालं आहे. चंबा या गावावर अमरेश महाजन यांच्या मृत्यूनंतर शोककळा पसरली आहे.
घटनेमुळे हळहळले लोक
या घटनेनंतर रामलीला मैदानात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांमध्ये आणि कलाकारांमध्ये दुःखाची लाट पसरली. मंचावर अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे लोक स्तब्ध झाले होते. रामलीला आनंदात सुरु होती तिथे अचानक स्मशान शांतता पसरली. कलाकाराच्या आठवणीत अनेक लोक भावूक झाल्याचं पाहण्यास मिळालं. तसंच चंबा या गावावर शोककळा पसरली आहे.
