लग्न हा अनेकांच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा क्षण असतो. पती-पत्नी दोघांसाठी लग्नाच्या दिवसाच्या आठवणी खास असतात. लग्नानंतर अनेक वर्षांनीही या आठवणी दोघांच्या मनात ताज्या असतात. मात्र, काही लग्नांमध्ये फजितीचे प्रसंगदेखील ओढावतात. असाच काहीसा प्रकार एका पंजाबी जोडप्याच्या लग्नात पाहायला मिळाला. एका गुरूद्वारामध्ये हा विवाहसोहळा सुरू होता. यावेळी रितीनुसार वधू-वर सात फेरे घेत असताना अचानक नवऱ्या मुलाच्या पायजम्याची नाडी सुटली. ही गोष्ट लक्षात येताच नवरदेवाने एका हाताने पायजमा सावरत फेरे मारण्यास सुरूवात केली. एव्हाना ही गोष्ट अनेकांच्या लक्षात आल्यामुळे सर्वजण हसायला लागले. तेवढयात नवरदेवाची आई पुढे आली आणि तिने सुटणा-या पायजम्याची नाडी बांधली. दरम्यान, हा प्रसंग बघून तेथे उपस्थित असणाऱ्यांचे चांगलेच मनोरंजन झाले. या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.