Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत जगातील अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात आयातशुल्क लादलं आहे. भारत रशियाकडून खजिन तेल खरेदी करत असल्याचा मुद्दा उपस्थित करत ट्रम्प यांनी भारतावरही तब्बल ५० टक्के टॅरिफ लादलेलं आहे. एवढंच नाही तर ट्रम्प भारताला सातत्याने डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ट्रम्प यांच्या दबावाला भारताने जुमानलं नाही. यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनलाही १०० टक्के टॅरिफ लादण्याची धमकी दिली आहे.
रशियावरील चीनची आर्थिक पकड कमजोर करण्यासाठी नाटो देशांना ५०-१०० टक्के टॅरिफ लादण्याचं आवाहन ट्रम्प यांनी केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते असं केल्यास युक्रेनमधील युद्ध संपुष्टात येईल, म्हणजेच ट्रम्प यांनी एकप्रकारे ते रशियावर कठोर निर्बध लादण्यास तयार असल्याचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफ लादण्याच्या धमकीला आता चीनने प्रत्युत्तर दिलं आहे.
चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीला प्रत्युत्तर देत युद्धे समस्या सोडवू शकत नाही असं म्हटलं. स्लोव्हेनियाचे परराष्ट्र मंत्री तंजा फाजोन यांची भेट घेतल्यानंतर शनिवारी लुब्लियानामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री वांग यी ही प्रतिक्रिया दिली. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.
“चीन युद्धांमध्ये भाग घेत नाही किंवा युद्धांची योजना आखत नाही आणि चीन शांतता चर्चेला प्रोत्साहन देणे आणि चर्चेद्वारे महत्त्वाच्या मुद्द्यांचं राजकीय निराकरण करतो. चीन आणि युरोपने प्रतिस्पर्ध्यांऐवजी मित्र असले पाहिजेत आणि एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे”, असं वांग यी म्हणाले. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो देशांनी चीनवर ५० टक्के ते १०० टक्के कर लादण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर वांग यी यांनी अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
ट्रम्प यांनी नाटो देशांना काय आवाहन केलं?
डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो देशांना शनिवारी एक पत्र जारी केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवावे आणि रशियवर कठोर निर्बंध लादावेत अशी मागणी केली. ट्रूथ सोशलवर केलेल्या पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “जेव्हा सर्व नाटो देश रशियावर कठोर निर्बंध लावण्यास तयार असतील आणि जेव्हा ते हे करण्यास सुरूवात करतील आणि जेव्हा सर्व नाटो देश रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करतील तेव्हा मी रशियावर कठोर निर्बंध लादण्यासाठी तयार आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपल्यावर पूर्णपणे मागे घेतले जातील असे ५० टक्के ते १०० टक्के टॅरिफ चीनवर लावले तर ते युद्ध संपवण्यासाठी खूप मदतीचे ठरेल,” असंही ट्रम्प म्हणाले होते.