Congress leader Umang Singhar: मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते उमंग सिंघार यांच्या एका विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. सिंघार म्हणाले की, आम्ही आदिवासी आहोत, हिंदू नाही. या विधानानंतर आता सत्ताधारी भाजपाने त्यांच्यावर टीका केली आहे. छिंदवाडा येथे आदिवासी विकास परिषदेत बोलत असताना सिंघार यांनी गुरूवारी हे विधान केले. तसेच भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते आदिवासींना हिंदू असा शिक्का लावण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप त्यांनी केला.

सिंघार म्हणाले, “मी अभिमानाने सांगतो की, आम्ही आदिवासी आहोत, हिंदू नाही. मी हे अनेक वर्षांपासून सांगत आलो आहे.” यावेळी सिंघार यांनी रामायणातील एका प्रसंगाचा दाखला दिला. ते म्हणाले, रामायणात शबरी प्रभू रामाला उष्टे बोरं दिली होती. तीदेखील आदिवासी होती. जे आदिकाळापासून या भूमीवर वास्तव्य करत आले आहेत, ते आदिवासी आहेत. आदिवासी समाजाला आपली ओळख प्रस्थापित करावी लागणार आहे.

चार वेळा आमदार राहिलेले उमंग सिंघार हे भिल समाजाचे नेते आहेत. मध्य प्रदेशमध्ये मोठ्या संख्येने या जमातीचे लोक आहेत. वाद उद्भवल्यानंतर आपल्याला कुणाच्याही श्रद्धांचा अवमान करायचा नव्हता, असे स्पष्टीकरण सिंघार यांनी दिले. “आम्ही कोणत्याही धर्माचा अनादर करत नाही. पण आपला समुदाय, आपल्या परंपरा, आपली संस्कृती आणि आपला वारसा जपला पाहिजे”, असे ते म्हणाले. तसेच सत्तेत कोणताही पक्ष असला तरी त्यांनी आदिवासींना आदर दिला पाहिजे, असेही ते म्हणाले.

सिंघार आदिवासी विकास परिषदेत बोलताना म्हणाले की, भाजपाची सर्वात मोठी समस्या ही आहे की, त्यांनी आदिवासींना कधीही पूर्णपणे आपले म्हणून समजले नाही. अनेक वर्षांपासून संघ आणि त्यांच्याशी संबंधित संलग्न संघटना आदिवासींना वनवासी हिंदू असे संबोधून त्यांना हिंदू धर्मात सामावून घेण्याची रणनीती आखत आहेत. आरक्षण संपवणे हे त्यांचे मोठे ध्येय असल्याचाही आरोप सिंघार यांनी केला.

काँग्रेस नेते उमंग सिंघार यांच्या या विधानानंतर मध्य प्रदेशमध्ये राजकीय वाद उद्भवला आहे. यावेळी थेट मुख्यमंत्री मोहन यादव यांनी नाराजी व्यक्त केली असून काँग्रेसला लक्ष्य केले आहे. काँग्रेसच्या या मानसिकतेची चीड येते, अशी प्रतिक्रिया यादव यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री यादव पुढे म्हणाले, “काँग्रेस नेहमीच हिंदू आणि हिंदुत्वाच्या विरोधात प्रतिक्रिया देत आला आहे. जर ते हिंदुत्वाविरोधात प्रश्न उपस्थित करत असतील तर जनता त्यांना कधीही माफ करणार नाही. काँग्रेस नेत्यांनी याबद्दल माफी मागायला हवी.”