दलितांवर समाजातील विशिष्ट वर्गाकडून होणारे हल्ले येत्या काळात थांबायला हवेत. अन्यथा आम्हाला हिंदू धर्म सोडून दुसऱ्या धर्मात जाण्याचा विचार करावा लागेल, असा इशारा मुरादाबाद येथील दलित समाजातील लोकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिला.

मुरादाबादमधील रामगंगा नदीच्या किनाऱ्यावर दलित समाजातील लोक सामाजिक एकत्रिकरणासाठी जमलेले असताना त्यांनी ही भावना व्यक्त केली. धर्मपरिवर्तनाच्या दिशेने हे आमचे पहिले पाऊल असेल, असे संघटनेचे अध्यक्ष व भारतीय वाल्मिकी समाजाचे प्रमुख लल्ला बाबू द्रविड यांनी यावेळी सांगितले. जातीमुळे आमच्यावर समाजातील ठराविक वर्गाकडून सातत्याने हल्ले होणार असतील, तर या धर्मात राहण्यात काही अर्थ नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जातीवरुन होणाऱ्या हल्ल्याला वैतागले असल्याने उत्तर प्रदेशातील मुरादाबाद आणि त्याच्या आसपासच्या जिल्ह्यांमधील जवळपास ५०० दलित कुटुंबे आपल्या धर्माचा त्याग करु इच्छितात, असे द्रविड म्हणाले. यावेळी सहारनपूर येथे नुकत्याच झालेल्या दलित व्यक्तीच्या हत्येबाबतही त्यांनी सांगितले. हल्ला केलेले लोक आता दलितांना गाव सोडायला सांगत आहेत. त्यामुळे आदित्यनाथ यांचे सरकार दलितांसाठी नाही, असा आरोपही त्यांनी केला.

५ मे रोजी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या यात्रेदरम्यान दोन गटांमध्ये वाद झाले होते. या वादाचे रुप हिंसक झाले आणि त्यात एकाचा मृत्यू झाला होता. यावेळी जमावाकडून दलितांची २५ घरे जाळण्यात आली होती.