भारतीय किसान यूनियनचे (बीकेयू) नेते राकेश टिकैत यांनी हरियाणाच्या जिंदमधील शेतकऱ्यांकडून स्वातंत्र्य दिनी आयोजित करण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीचं समर्थन केलं आहे. टिकैत यांनी म्हटलं आहे की ट्रॅक्टर रॅली काही वाईट गोष्ट नाही. कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढली होती. त्यावेळी मोठ्याप्रमाणात हिंसाचार देखील घडला होती.

आम्ही १४ व १५ ऑगस्ट रोजी ट्रॅक्टरद्वारे गाझीपूर बॉर्डरवर जाऊ आणि १५ ऑगस्टला झेंडा फडकवू. दोन जिल्ह्यांमधून ट्रॅक्टर जातील, असं सांगून त्यांनी २६ जानेवारी रोजी आम्ही राष्ट्रीय ध्वज हटवला नव्हता, असं देखील राकेश टिकैत यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.

संयुक्त किसान मोर्चाने उत्तराखंड, उत्तरप्रदेश, पंजाब व देशातील अन्य भागांमध्ये जाऊन सरकारची धोरणं आणि काम यावर शेतकऱ्यांशी बोलणार असल्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, ५ सप्टेंबर रोजी मुजफ्फरनगर(उत्तरप्रदेश) येथे महापंचायत होणार आहे. संपूर्ण देश व्यापला जाईल, अशी माहिती भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी आज दिली.

राकेश टिकैत म्हणाले की, ट्रॅक्टर रॅली काढण्यात काहीच चुकीचं नाही. जिंद(हरियाणा) मधील लोक क्रांतीकारी आहेत. त्यांनी १५ ऑगस्ट रोजी ट्रॅक्टर रॅली काढण्याचा योग्य निर्णय घेतला आहे. मला नाही माहिती की संयुक्त किसान मोर्चाने काय निर्णय घेतला आहे. तिंरगा ध्वज फडकत असलेली ट्रॅक्टर परेड पाहाणं हा गर्वाचा क्षण असेल.