दहशतवाद्यांचे प्रमुख शस्त्र आयईडी असते, तर लोकशाहीत व्होटर आयडी हे प्रभावी शस्त्र असते, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी अहमदाबादमधील रानिप येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मोदी म्हणाले, आज देशात तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. लोकशाहीतील या पवित्र पर्वात सहभागी होण्याची मला संधी मिळाली. कुंभमेळ्यात गंगास्नान केल्यावर पवित्रतेचा अनुभव येतो. तसेच लोकशाहीत मतदान करुन पवित्रतेचा अनुभव येतो. देशातील सर्व मतदारांना मी आवाहन करतो की त्यांनी उत्साहाने या मतदान प्रकियेत सहभागी व्हावे. भारतीय मतदार हा समजूतदार आहे. त्याला खरे आणि खोटे समजते, असेही त्यांनी नमूद केले.
#WATCH PM Narendra Modi after casting his vote in Ahmedabad says, " The weapon of terrorism is IED, the strength of democracy is voter ID." #LokSabhaElections2019 pic.twitter.com/X0LBPI5qcu
— ANI (@ANI) April 23, 2019
पहिल्यांदा मतदान करणाऱ्या नवमतदारांची देशातील स्थिर सरकारमध्ये प्रमुख भूमिका असेल. आगामी काळ नवमतदारांचा असेल, त्यामुळे त्यांनी शंभर टक्के मतदान करावे, असे त्यांनी सांगितले. एकीकडे दहशतवादाचे शस्त्र आयईडी असते, तर लोकशाहीतील शस्त्र व्होटर आयडी असते, व्होटर आयडी हे आयईडीपेक्षाही जास्त शक्तिशाली आहे. आपण या व्होटर आयडीचे महत्त्व समजून घ्यावे आणि जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे, असे मोदींनी म्हटले आहे.