Jyoti Malhotra : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाप्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला हिसार पोलिसांनी अटक केलं आहे. हेरगिरी केल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. पोलीस चौकशीत नवनवे खुलासे समोर येत आहेत. ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती आणि व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅट सारख्या ॲप्सच्या माध्यमातून ती काही संवेदनशील माहिती पुरवत असल्याचा आरोप तिच्यावर आहे.

दरम्यान, यूट्यूबर ज्योती मल्होत्रावरील कारवाई झाल्यानंतर तिच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली होती. ज्योती मल्होत्रा ही यूट्यूब व्हिडीओंसाठी पाकिस्तानला गेली होती असं तिच्या वडिलांनी म्हटलं होतं. एवढंच नाही तर सीमेपलीकडील तिच्या मित्रांशी संपर्क का करू शकत नाही? असा सवाल करत ज्योती मल्होत्राचा वडिलांनी एकप्रकारे बचाव केला होता. मात्र, यानंतर आता पुन्हा ज्योती मल्होत्राच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी आता यू टर्न घेतल्याचं बोललं जात आहे.

युट्यूबर ज्योती मल्होत्राचे वडील हरीश मल्होत्रा ​​यांनी म्हटलं की, त्यांना तिच्या पाकिस्तान दौऱ्यांबद्दल पूर्णपणे माहिती नव्हतं. त्यांनी असंही म्हटलं की ज्योती मल्होत्रा ​​त्यांना दिल्लीला जात असल्याचं सांगायची. मात्र, पाकिस्तानला भेट देण्याबद्दल तिने आपल्याला कधीही काहीही सांगितलं नव्हतं, असं ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी नेमकं काय म्हटलं?

ज्योती मल्होत्राला पोलिसांनी अटक केल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना ज्योती मल्होत्राच्या वडील म्हणाले की, “गुरुवारी पहिल्यांदा पोलीस घरी आले. पोलिसांनी आमचे बँक पासबूक,, कागदपत्रे, फोन, लॅपटॉप आणि पासपोर्ट जप्त केले आहेत. तसेच त्यांची मुलगी दिल्लीला येत असे आणि गेल्या चार-पाच दिवसांपासून ती हिसारमध्ये होती. पण मला माहित नव्हतं. तिने मला सांगितलं होतं की ती दिल्लीला जाणार आहे. तिने मला कधीही काहीही सांगितलं नाही”, असं ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी म्हटलं आहे.

“तसेच तिच्या कोणत्याही मैत्रिणी किंवा मित्र आमच्या घरी आलेले नाहीत. तिने मला काहीही सांगितलं नाही. आता मला काय बोलावं ते कळत नाही. ती घरी व्हिडीओ बनवायची. मी कधीही म्हटलं नव्हतं की ती पाकिस्तानला गेली आहे. ती मला सांगायची की ती दिल्लीला जात आहे. आता तिच्याबाबत माझी कोणतीही मागणी नाही. जे काही होणार आहे ते होईल”, असं ज्योती मल्होत्राचे वडील हरीश मल्होत्रा ​​यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

ज्योती मल्होत्रा पाकिस्तानला माहिती कशी पुरवायची?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी गुप्तचर संस्थेमधील अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती आणि व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅट सारख्या ॲप्सचा वापर करून ती भारतातील संवेदनशील माहिती पुरवत होती. पाकिस्तानचे गुप्तचर विभागातील अधिकारी शाकीर आणि राणा शाहबाज यांचाही फोन नंबर ज्योतीच्या मोबाइलमध्ये सेव्ह असल्याचे दिसून आले. कुणाला संशय येऊ नये म्हणून हे मोबाइल नंबर तिने जट रंधावा या नावाने सेव्ह केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्योती मल्होत्रा चीनलाही गेली होती!

दरम्यान, पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ज्योती रानी मल्होत्रा ही पाकिस्तानला अनेकदा जाऊन आली आहे. मात्र, त्यासोबतच ती चीनलादेखील गेली होती. तिच्या प्रवासाचा तपशील आणि आर्थिक बाबींची तपासणी केली जात आहे. ज्योती रानी मल्होत्रा ही पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह्ज अर्थात PIO च्यादेखील संपर्कात होती. ज्योतीकडे भारतीय लष्कर किंवा संरक्षण विभागाशी संबंधित बाबींची थेट माहिती मिळण्याची शक्यता नसली, तरी ती ज्या ठिकाणी राहाते, ते हिसार एक महत्त्वाचं धोरणात्मक ठिकाण आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक शशांक कुमार सावन यांनी दिली आहे.